नांदेड : गेल्या तीन महिन्यांपासून थकीत वेतनासाठी नांदेडातील उपवनसंरक्षक कार्यालयासमोर कामगारांचे धरणे आंदोलन सुरू आहे. त्यातच एका आंदोलनकर्त्या महिलेची तब्बेत अचानक बिघडल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान सोमवारी पहाटे या महिलेचा मृत्यू झाला.
न्यायासाठी गेल्या तीन महिन्यांपासून लोकशाही मार्गाने आंदोलन करणाऱ्या महिला कामगाराचा असा दुर्दैवी शेवट झाला. परंतु प्रशासन मात्र अद्यापही ढिम्म आहे. मराठवाडा श्रमिक कामगार संघटनेकडून हे आंदोलन करण्यात येत आहे. कामगारांना दररोज ४४७ रुपये मजुरी मिळायला हवी. परंतु प्रत्यक्षात हातात दीडशे ते दोनशे रुपये दिले जातात. त्यात एप्रिल २०२० पासून थकीत वेतनही मिळाले नाही. किमान वेतन मिळाले पाहिजे, किमान वेतन कायद्याप्रमाणे हजेरी कार्ड व वेतन पावती दरमहा वेतनासाठी दिली जावी. न्यायालयीन आदेशाप्रमाणे कामगारांना कामावर घेतले पाहिजे. सेवा ज्येष्ठतेप्रमाणे ज्येष्ठ कामगारांना प्राधान्य द्यावे. राेजंदारी कामगारांना भविष्य निर्वाह निधीचा लाभ मिळावा. औद्योगिक न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे कामगारांना नोकरीत कायम केले पाहिजे. यासह इतर मागण्यांसाठी २९ मे पासून या कामगारांनी उपवनसंरक्षक कार्यालयासमोर धरणे आंदोलन सुरू केले होते.
या आंदोलनात लोणी ता. किनवट येथील कौशाबाई प्रल्हाद परचाके (५४) या सहभागी झाल्या होत्या. २८ ऑगस्ट रोजी रात्री त्यांची तब्बेत अचानक बिघडल्याने त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. या घटनेवर वन मजुरांनी संताप व्यक्त केला आहे.
मृतदेह ताब्यात घेण्यास नकारकौशाबाई यांचा आंदोलनादरम्यान मृत्यू झाल्यानंतर आंदोलनकर्ते आक्रमक झाले होते. त्यांनी कौशाबाई यांचा मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला. तर दुसरीकडे उपवनसंरक्षक कार्यालयासमाेर पोलिसांचा बंदोबस्त वाढविण्यात आला होता. प्रवेशद्वारातून कुणालाही आत सोडण्यात येत नव्हते.