नांदेड- शहरातील एका खाजगी हॉस्पिटलच्या शेजारी असलेल्या औषध विक्री दुकानात खुर्चीवर बसल्याजागीच औषध विक्रेत्याला हृदयविकाराचा धक्का बसला. त्यात अवघ्या काही क्षणात या विक्रेत्याचा मृत्यू झाला. ही घटना 3 एप्रिल रोजी रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास घडली.
पवन तापडीया असे या औषध विक्रेत्याचे नाव आहे. ते जुना कौठा भागातील रहिवासी होते. मंगळवारी सायंकाळी ते एका खाजगी हॉस्पिटलमधील पहिल्या मजल्यावर असलेल्या औषधी दुकानात आले होते. त्यानंतर संगणकावर ते काम करीत होते. यावेळी शेजारी त्यांचा एक सहकारीही बसला होता. त्याचवेळी हृदयविकाराचा तीव्र धक्का बसून पवन तापडीया हे खुर्चीतून खाली कोसळले. सहकाऱ्यांनी लगेच त्यांना रुग्णालयात दाखल केले. परंतु डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. तापडीया यांच्यावर बुधवारी सकाळी गोवर्धन घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.