- नितेश बनसोडेमाहूर (जि.नांदेड): गणेश टेकडीवरील एका घराला आज दुपारी साडेतीन वाजेच्या दरम्यान अचानक आग लागली. दरम्यान, घरातील दोन गॅस सिलेंडरचा स्फोट झाल्याने मोठा आवाज होऊन परिसर हादरला. आग आणि स्फोटामुळे घर भस्मसात होऊन मोठे नुकसान झाले आहे.
सुनिता बाळसकर यांचे गणेश मंदिराजवळ घर आहे. त्या आणि आशिष व गौरव ही दोन मुले मोलमजुरी करून उदरनिर्वाह करतात. तसेच आशीष हा यूपीएससी परीक्षेची तयारी करीत आहे. आज दुपारी साडेतीन वाजता तिघेही बाहेर असताना घराला अचानक आग लागली. काही वेळातच आगीने सर्व घर कवेत घेतले. तसेच घरातील दोन गॅस सिलेंडरचा स्फोट झाला. स्फोटाचा मोठा आवाज आणि धुराच्या लोटामुळे नागरिकांनी गणेश टेकडीकडे धाव घेतली. मोठ्या प्रयत्नाने नागरिकांनी आग विझवली. घरात कुणीही नसल्यामुळे अनर्थ टळला. मात्र, घरातील सर्व जीवनावश्यक वस्तू जाळून खाक झाल्या. आगीत सुमारे दोन लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.
घटनेची माहिती मिळतात पो. नि. नामदेव रीठ्ठे, स. पो. नि. संजय पवार पो. उप नि. शरद घोडके, रामचंद्र दराडे, छगन राठोड, विजय आडे, प्रकाश देशमुख, सुशील राठोड, पवन राऊत व तलाठी भानुदास काळे यांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली.