उमरी (नांदेड) : शेतातून आलेले हरीण अचानक रस्त्यावर आल्याने स्कूलरिक्षा उलटून अपघात झाल्याची घटना आज सकाळी ९ वाजेच्या सुमारास हातणी ते बळेगाव रस्त्यावर झाला. या अपघातात एक विद्यार्थी ठार झाला असून इतर दोघे गंभीर जखमी झाले आहेत. गणेश गोविंद निलेवाड ( १३ वर्षे वर्ग - सातवा रा. हातणी) असे मृताचे नाव आहे. तर साक्षी सयाजी निलेवाड ( १५) आणि विनायक माधव मोगले ( १३, दोघे रा. हातणी) हे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना अधिक उपचारासाठी नांदेडला हलविण्यात आले आहे.
हातणी या गावातील गणेश गोविंद निलेवाड, साक्षी सयाजी निलेवाड आणि विनायक माधव मोगले हे तिघे इतर चार विद्यार्थ्यांसोबत विद्यार्थी दररोज प्रमाणे बळेगाव येथील कृष्णामाई विद्या मंदिरला स्कूलरिक्षामधून जात होते. सकाळी ९ वाजेच्या सुमारास हातणी ते बळेगाव रस्त्यावर अचानक समोर हरिण आले. हरणाच्या धडकेने रिक्षा उजव्या बाजूला उलटला. नागरिकांनी लागलीच रिक्षा सरळ केली. यावेळी रिक्षातील उजव्या बाजूला बसलेली गणेश, साक्षी आणि विनायक ही तिन्ही मुले गंभीर जखमी झाले. सर्व जखमींना उमरी येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.
येथे उपचारादरम्यान गणेश गोविंद निलेवाड याचा मृत्यू झाला. तर साक्षी आणि विनायक यांना अधिक उपचारासाठी नांदेड येथे रवाना करण्यात आले. विशेष म्हणजे, रिक्षा चालकाला यात कसलीही दुखापत झाली नाही, तसेच इतर चार विद्यार्थी बालंबाल बचावले. गणेश निलेवाड याच्या पश्चात तीन बहिणी आई-वडिल असा परिवार आहे. मुलाच्या मृत्यूची माहिती मिळताच त्याच्या नातेवाईकाने एकच टाहो फोडला. गावातही अपघाताची बातमी समजताच हळहळ व्यक्त आहे.
दरम्यान, अपघातात इतर काही विद्यार्थ्यांना किरकोळ दुखापत झाली आहे. सर्व जखमींवर उमरी येथील ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी डॉ. एम. एम. चंदापुरे व डॉ. कोमल नरवाडे यांनी उपचार केले. माहिती मिळताच पोलीस निरीक्षक अंकुश माने, उपनिरीक्षक मुक्तीराम चेवले आदींनी अपघातस्थळी भेट देऊन पंचनामा केला.