- गोविंद टेकाळे अर्धापूर ( जिल्हा नांदेड ) : तालुक्यातील दाभड परिसरात तीन वाहनांचा विचित्र अपघात झाला. या अपघातात १० जण जखमी झाले आहेत. त्यापैकी २ जण ठार तर २ जणांची प्रकृती चिंताजनक आहे. नांदेड- नागपूर हायवेवर दाभड हद्दीतील बाबा पेट्रोल पंपाजवळ हा भीषण अपघात सोमवारी रात्री साडेबारा वाजता झाला.
नांदेड - नागपूर हायवेवर बाबा पेट्रोल पंपाजवळ रात्री साडेबारा वाजता चालकाचे नियंत्रण सुटल्याने कार ( एम.एच ३७ जी ९८८९ ) दुभाजक ओलांडून रस्त्यावर विरुद्ध दिशेकडे गेली. यावेळी कारने ट्रकला जोरदार धडक दिली. याच दरम्यान, पाठीमागून येत असलेली दुसरी कार ( क्र.एम.एच २३. ए.डी.३५६७ ) ट्रकवर धडकली.
या तिहेही अपघातात ट्रक चालक रामा प्रल्हाद डोंगरे ( ५० रा.इंचगाव ता.मोहोळ जि.सोलापूर ) व कारमधील अमित विठ्ठल घुगे ( वय २९ रा.तरोडा) या दोघांचा जागीच मृत्यू झाला. अपघाताची माहिती मिळताच महामार्गाचे अविनाश चव्हाण, पोउनि कपिल आगलावे, इर्शाद बेग,चालक रमाकांत शिंदे, राजकुमार व्यवहारे, संदीप चटलेवार, जसप्रीत सिंग शाहू, वसंत शिंनगारे,कल्याण पांडे, महेंद्र डांगे यांनी धाव घेत जखमींना नांदेड येथील खाजगी रुग्णालयात पुढील उपचारासाठी दाखल केले.
जखमींचे नावे अशी कार मधील: स्वप्निल शिवाजी पाटील, साईनाथ मुळे ( रा.नाईक नगर नांदेड), अभिजीत शिरफुले हे गंभीर जखमी झाले आहेत. तर ट्रकला पाठीमागून धडकलेल्या दुसऱ्या कारमधील झेहनब सय्यद, नजमा बेगम, सय्यद अहमद, नाहीद बेगम, जावेद सय्यद, सय्यद अयान ( रा.सर्व बरकतपुरा माळटेकडी रोड नांदेड) किरकोळ जखमी झाले आहेत.