- मारोती चिलपिपरे कंधार : तालुक्यातील बोरी खु येथे पत्नी आणि मुलीचा निर्घृण खून केल्याची घटना १३ सप्टेंबर रोजी पहाटे घडली होती. या हत्या प्रकरणातील माय-लेकींवर १३ सप्टेंबर रोजी सायंकाळी कंधार तालुक्यातील पळसवाडी येथे जड अंतकरणाने एकाच सरणावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
भारतीय सैन्य दलात सेवेत असलेल्या आरोपी एकनाथ मारोती जायभाये या सैनिकाने सुटीवर गावाकडे आल्यानंतर ८ महिन्यांची गरोदर पत्नी भाग्यश्री आणि ३ वर्षाची मुलगी सरस्वती या दोघींचा गळा दाबून खून केला होता. घटनेनंतर आरोपी एकनाथ जायभाये हा स्वतःहून माळाकोळी पोलिस ठाण्यात हजर झाला होता. या घटनेने संपूर्ण जिल्हा हादरून गेला होता. दरम्यान, या प्रकरणातील मयत भाग्यश्री जायभाये आणि त्यांची मुलगी सरस्वती यांच्या पार्थिवावर १३ सप्टेंबर रोजी सायंकाळी पळसवाडी ता. कंधार येथे एकाच सरणावर जड अंतःकरणाने अग्नी देण्यात आला. या प्रकरणात मयत भाग्यश्री यांची आई दैवशाला केंद्रे यांच्या फिर्यादीवरून आरोपी पती एकनाथ, सासरा मारुती, सासू अनुसया, दीर दयानंद यांच्याविरुद्ध माळाकोळी पोलीस ठाण्यामध्ये खुनाचा गुन्हा दाखल झाला होता. पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली आहे.
संशयावरून खून केल्याची कबुलीआरोपी एकनाथ जायभाये याने पत्नीवर संशय असल्याने खून केल्याची कबुली पोलिसांकडे दिली आहे. दरम्यान, रक्तदाब वाढल्याने त्याला दवाखान्यात दाखल केले असल्याची माहिती पोलिसांनी दिली. या प्रकरणाचा तपास माळाकोळी पोलिस करीत आहेत.
सैनिकाकडून घडलेले कृत्य निंदनीयबोरी खू येथे एका सैनिकाकडून घडलेले कृत्य निंदनीय आहे. सैनिकी पैशाला काळीमा फासणारी ही घटना आहे. या घटनेचा आम्ही जाहीर निषेध करीत आहोत. तसेच आम्ही मयत मुलीच्या परिवारासोबत खंबीरपणे उभे आहोत. आरोपीला फाशीची शिक्षा झाली पाहिजे, असा आम्ही पाठपुरावा करू, असे माजी सैनिक संघटनेचे जिल्हाध्यक्ष बालाजी चुकलवाड यांनी सांगितले.