- शब्बीर शेख
देगलूर : येथील मस्जिद-ए-हुजूर गंज येथे गैरमुस्लीम नागरिकांसाठी मस्जिदीमध्ये कशा पद्धतीने धर्माचे आचरण आणि नमाज पठण करण्यात येते. त्यासाठीच्या सुविधा व सोयीबद्दल विस्तृत अशी माहिती देणाऱ्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी उपस्थित गैरमुस्लीम समाजामध्ये मस्जिदीविषयी असलेले गैरसमज दूर करण्यासाठी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला असल्याचे आयोजकांतर्फे सांगण्यात आले.
शहरातील मस्जिद-ए-हुजूर गंज, आझाद कॉलनी या ठिकाणी मस्जिद परिचय कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमांतर्गत उपस्थित गैरमुस्लीम समाजातील उपस्थित नागरिकांना मुस्लीम समाजाचे कुरान-ए-शरीफ आणि त्यांचे प्रेषित यांच्याबद्दल विस्तृत माहिती सांगण्यात आली. नमाज पठणाची वास्तविकता काय आहे? ईश्वराचे आदेश काय आहेत आणि सर्व मानव जातीला कशा पद्धतीने वागणूक वर्तन आणि व्यवहार करावयाचे असते तसेच मस्जिदीची ठेवण कोणत्या पद्धतीची असते, या मस्जिदीमध्ये धर्मविषयक आणि ईश्वराविषयी माहिती देण्याचे व भाईचाऱ्याने राहण्याचे संकेत कसे दिले जातात, मुस्लीम समाजाविषयी असलेला गैरसमज कशा पद्धतीने वाढत आहे? मुस्लीम समाजात स्त्रियांना किती, कशा प्रकारचे स्थान आहे व इतर समाजाविषयी मुस्लीम समाजामध्ये काय भावना असतात, याविषयी मार्गदर्शन केले. आजपर्यंत मुस्लीम समाजाविषयी, ध्वनिक्षेपणावरून प्रार्थनाविषयी व ईश्वराबद्दल आणि धर्माबद्दल सांगण्यात येणाऱ्या संदेशाबाबत अनेक प्रकारचे गैरसमज निर्माण झालेले आहेत. ते दूर करण्यासाठी व वास्तविक रूपामध्ये मस्जिदीत रोजच्या रोज कशाप्रकारे ईश्वराचे नामस्मरण केले जाते याविषयी सुद्धा धर्म अभ्यासकांनी सांगितले.
मुस्लीम समाजाविषयी इतर समाजांमध्ये पसरत असलेला गैरसमज दूर करण्यासाठीच हा मुस्लीम समाजातर्फे करण्यात आलेला प्रयत्न अत्यंत स्तुत्य असा आहे, असे भावोद्गगार यावेळी उपस्थित हिंदू धर्मातील नागरिकांकडून काढण्यात आले. असे कार्यक्रम पुनःपुन्हा व्हावेत, जेणेकरून सामाजिक तेढ निर्माण होणार नाही आणि अशा कार्यक्रमातून सर्व समाजातील दैव आणि ईश्वराबद्दल सविस्तर अशी माहिती सर्वांनाच ठाऊक होईल, असेही उपस्थितांमधून सांगण्यात आले. यावेळी आमदार जितेश अंतापूरकर, माजी नगराध्यक्ष मोगलाजी शिरशेटवार, शिवसेना उपजिल्हाप्रमुख महेश पाटील, माजी उपनगराध्यक्ष अविनाश निलमवार, उद्योजक दीपक कांबळे, कपिल महेंद्रकर आदी उपस्थित होते.