नांदेड: पोटाची खळगी भरण्याकरिता हातगाडीवर रसवंती गृह सुरु केलेल्या एका कुटुंबावर होळी सणाच्या दिवशीच दुःखाचा डोंगर कोसळला. हातगाडीवरील रसवंती यंत्र सुरू करून उसाचा रस काढतानाच साडीचा पदर मशिनमध्ये अडकून गळफास बसल्याने दुर्गा नवनाथ खोंड या ४० वर्षीय महिलेचा करूण अंत झाला. ही घटना १७ मार्च रोजी सायंकाळी उशिरा नांदेडच्या कौठा परिसरात घडली.
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नवनाथ खोंड हे मुळचे आसेगाव (ता. वसमत जि. हिंगोली) येथील रहिवासी आहेत. मजूर असलेले हे कुटुंब पोटाची खळगी भरण्यासाठी सध्या नवीन नांदेडातील आस्था सिटी परिसरात पत्नी दुर्गा व दोन मुलांसह राहत. उन्हाळ्यात मजुरी भेटत नसल्याने हातगाडीवर रसवंती गृहाच व्यवसाय त्यांनी सुरु केला. दोघे नवराबायको सकाळीच हातगाडी घेऊन ठिकठिकाणी थांबत व्यवसाय करत.
दरम्यान, होळी सणाच्या दिवशीसुद्धा खोंड दांपत्य यांची कौठा येथील ओम गार्डन मंगल कार्यालयाजवळील रोडवर काम करत होते.सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास उसाचा रस काढत असताना अंगावरील साडीचा पदर मशिनमध्ये अडकून दुर्गा यांना गळफास बसला. यातच दुर्गाबाई खोंड यांचा दुर्दैवी मृत्यू झाला, अशी माहिती सहाय्यक पोउपनि. ज्ञानोबा गिते व मदतनीस म. पो. कॉ. ज्योती आंबटवार यांनी दिली. त्यांच्या पश्चात पती आणि एक मुलगा व एक मुलगी असा परिवार आहे.
याप्रकरणी नवनाथ उत्तमराव खोंड यांनी दिलेल्या माहितीचेआधारे नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्युची नोंद करण्यात आली आहे. प्र. पो.नि. अशोक घोरबांड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेडकॉन्स्टेबल जी. के. पेदे याप्रकरणाचा अधिक तपास करीत आहेत.