श्रीनिवास भोसलेनांदेड : राज्यातील सत्ता बदलानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आसना नदीवरील पुलाचे नारळ फोडून भूमिपूजन करण्यात आले होते. जवळपास वर्ष लोटले तरी प्रत्यक्षात कामास सुरुवात झाली नाही. सरकारच्या या दिरंगाईचा काँग्रेसने नारळ फोडून निषेध नोंदवला. यावेळी आंदोलकर्त्यांना पोलीसांनी ताब्यात घेतले आहे.
नांदेड उत्तर मतदारसंघातील पासदगाव आसना नदी येथे वर्षापुर्वी मुख्यमंत्र्यांनी पुलाच्या कामाचे भुमीपुजन केले होते. परंतु अद्याप काम सुरु झाले नसल्यामुळे पासदगाव येथे मुख्यमंत्र्यांचा युवक काँग्रेसने आसना पुलावर नारळ फोडून निषेध नोंदविला. यावेळी युवक काँग्रेस शहर जिल्हाध्यक्ष डॉ. विठ्ठल पावडे, एन.एस.यु.आय जिल्हाध्यक्ष शशिकांत क्षिरसागर, नगरसेवक श्याम कोकाटे, नगरसेवक दीपक पाटील, अतुल पेदेवाड, निखील चौधरी, बंटी देशमुख, सत्यवान अंभोरे, गजानन सावंत, गंगाधर आडेराव, स्वप्नील नरमले, अक्षय नळगे, सुरज शिंदे, शुभम खोडके सह युवक काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते.
शिंदे यांच्या भूमिकेकडे लागले लक्षमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे रविवारी नांदेड जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. ऐनवेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा दौरा रद्द झाल्याने आता मुख्यमंत्री शिंदे हे काय भाष्य करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. त्यातच नांदेडमधील अनेक कामांचे मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते वर्षभरापूर्वी भूमिपूजन करण्यात आले होते. परंतु त्या कामांना अद्यापही सुरुवात झाली नाही. केवळ नारळ फोडण्याचे काम सरकार करीत असल्याचा निषेध म्हणून काँग्रेसने आंदोलन केले आहे. यावर मुख्यमंत्री शिंदे हे काय भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.