देगलूर (जि. नांदेड) : सोशल मीडियावर उत्तर प्रदेशातील मेरठ येथील महिला न्यायाधीशांशी मैत्री करून बदनामीची धमकी देत देगलूर येथील हिमांशू ऊर्फ हिमालय मारोती देवकत्ते (२७, रा. तमलूर, ता. देगलूर) या युवकाने ५० लाख रुपयांची खंडणी मागितली. याप्रकरणी १५ जानेवारीला सदर आरोपीवर मेरठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. फरार झालेल्या आरोपीला देगलूर पोलिसांनी तमलूर (ता. देगलूर) येथून मंगळवारी रात्री उशिरा ताब्यात घेत त्याच्या मुसक्या आवळल्या आहेत.
हिमांशू देवकत्ते या आरोपीने उत्तर प्रदेशातील एका महिला न्यायाधीशांसोबत सोशल मीडियावर मैत्री केली. मी मोठा व्यावसायिक असून, माझ्या मोठमोठ्या फॅक्टरी आहेत, असे सांगून त्याने दुसऱ्याच्या फॅक्टरी दाखवून सदर महिलेस विश्वासात घेत लग्न करण्यासाठी महिलेच्या कुटुंबीयांशी संपर्क साधला. मात्र, लग्नास नकार दिल्यानंतर आरोपीने पाठलाग सुरू केल्याने तो फ्रॉड असल्याचे महिलेला समजले. त्यानंतर आरोपीने महिलेचे फोटो सोशल मीडियावर टाकून तिची बदनामी केली. वारंवार धमकी देऊन नंतर ५० लाख रुपयांची खंडणी मागितली. तू माझी पत्नी म्हणून गावी महाराष्ट्रात नाही आल्यास आणखी बदनामी करून तुझे जीवन संपवील, अशाही धमक्या दिल्या. अखेर १५ जानेवारीला आरोपीविरुद्ध विविध कलमांन्वये मेरठ येथील सिव्हिल लाइन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. तेव्हापासून तेथील पोलिस आरोपीच्या मागावर होते.
देगलूर तालुक्यातून आरोपीस घेतले ताब्यातसदर गुन्ह्यातील आरोपी हा देगलूर पोलिस ठाणे हद्दीत वावरत असल्याची गुप्त माहिती पोलिस निरीक्षक मारोती मुंडे यांना मिळाली. त्यांनी मोहन कणकवले, साहेबराव सगरोळीकर, वैजनाथ मोटरगे, सुधाकर मलदोडे, राजवंतसिंघ बुंगई, नामदेव शिराळे या पोलिस कर्मचाऱ्यांना तत्काळ रवाना केले. तमलूर येथून आरोपीस मंगळवारी रात्री उशिरा ताब्यात घेऊन देगलूर पोलिस ठाण्यात आणले. याबाबत मेरठ येथील सिव्हिल लाइन पोलिसांना माहिती दिली.