नांदेड: बी.ए. द्वितीय वर्षाच्या परीक्षेत गुण कमी मिळाल्यामुळे निराश होवून एका १९ वर्षीय विद्यार्थिनीने गळफास घेवून आपली जीवनयात्रा संपविली आहे. असावरी भगवान रोकडे असे मृत तरुणीचे नाव असून ही घटना सकाळी धुमाळवाडी, (असर्जन, नांदेड) येथे उघडकीस आली.
नांदेड शहरालगत असलेल्या धुमाळवाडी- (असर्जन, नांदेड) येथील भगवान देवराव रोकडे यांची मुलगी असावरी भगवान रोकडे ही बी.ए. द्वितीय वर्षाची परीक्षा दिली होती. या परीक्षेत असावरीला तिच्या मनासारखे गुण मिळाले नसल्यामुळे दोन ते तीन दिवसांपासून असावरी रोकडे नाराज होती. या नैराश्यातूनच असावरी रोकडे ही २७ जून रोजी रात्री अकरा वाजता जेवण करून झोपण्याकरिता तिच्या खोलीत गेली.
दरम्यान, आज पहाटे पाच वाजेच्यादरम्यान, तिचे वडील (भगवान रोकडे) यांनी तिच्या खोलीत पाहिले असता, असावरीने छतास नायलॉन दोरीने गळफास घेवून आपली जीवनयात्रा संपविल्याचे चित्र त्यांच्या निदर्शनास आले आहे, अशी माहिती ठाणे अंमलदार सपोउपनि. धनंजय देशमुख व मदतनीस अंमलदार माधव स्वामी यांनी दिली. याप्रकरणी मयत असावरीचे वडील भगवान देवराव रोकडे यांनी दिलेल्या माहितीआधारे नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पो. नि. अशोक घोरबांड यांच्या मार्गदर्शनाखाली बीट अंमलदार शेख जावेद तसेच त्यांचे सहकारी हे याप्रकरणाचा अधिक तपास करीत आहेत.