नांदेड : किसान पेन्शन योजनेतील लाभार्थ्यांना ई-केवायसी, आधार प्रमाणीकरण, आधार लिंक या गोष्टींची पूर्तता करण्यासाठी शासनाने दीड वर्षाचा कालावधी दिला होता. आजपर्यंत जिल्ह्यातील १५ हजार ७९१ शेतकऱ्यांनी आधार संलग्न केले नसल्याने सदर शेतकरी केंद्र शासनाच्या पीएम किसानच्या १६ व्या हप्त्याला मुकावे लागणार आहे. शासनाकडून याबाबत वारंवार सूचना देऊनही दुर्लक्ष केल्याचा फटका शेतकऱ्यांना बसला.
जिल्ह्यात पीएम किसान योजनेसाठी ३ लाख ८७ हजार १५७ इतकी पात्र शेतकऱ्यांची संख्या आहे. त्यापैकी ५ फेब्रुवारीपर्यंत ३ लाख ८४ हजार ३१२ शेतकऱ्यांनी ई-केवायसी पूर्ण केली आहे. याचे प्रमाण ९९ टक्के इतके आहे; पण ई-केवायसी केल्यानंतर ३ लाख ७१ हजार ३६६ शेतकऱ्यांनीच आधार संलग्न केले आहे. त्यामुळे उर्वरित शेतकऱ्यांना केंद्र सरकारच्या पीएम किसानसह राज्य सरकारच्या नमो पेन्शन योजनेपासून वंचित राहावे लागणार आहे.
देशातील शेतकऱ्यांना आर्थिक आधार देण्यासाठी केंद्र सरकारने पाच वर्षांपूर्वी पी.एम. किसान सन्मान योजना सुरू केली आहे. यामध्ये प्रत्येक शेतकऱ्याला महिन्याला पाचशे रुपये असे चार महिन्यांचे दोन हजार रुपये वर्षाला तीन टप्प्यात दिले जातात, तर राज्य सरकारने नमो पेन्शन योजना सुरू केली आहे. या योजनेतही चार महिन्यांचे दोन हजार याप्रमाणे सहा हजार रुपये पेन्शन शेतकऱ्यांना दिली जात आहे; पण ई-केवायसी करूनही आधार संलग्नीकरण न केल्याने जिल्ह्यातील १५ हजारांपेक्षा अधिक शेतकरी या योजनांपासून वंचित राहणार आहेत.
ई-केवायसी प्रलंबित असलेले शेतकरीजिल्ह्यात ९९ टक्के ई-केवायसीचे काम पूर्ण झाले असून केवळ एक टक्के शेतकऱ्यांनी ई-केवायसी केलेली नाही. ई-केवायसी प्रलंबित असलेल्या शेतकऱ्यांची संख्या २८४५ इतकी आहे.
१६ व्या हप्त्यापासून वंचित राहणारे शेतकरीआधार संलग्नीकरण न केल्याने केंद्र शासनाच्या पीएम किसानच्या १६ व्या हप्त्यापासून, तसेच राज्य शासनाच्या नमो पेन्शन योजनेपासून १५ हजार ७९१ शेतकरी वंचित राहणार आहेत.
तालुकानिहाय शेतकरी संख्याई-केवायसी प्रलंबित असलेले तालुकानिहाय शेतकरी असे- अर्धापूर १२१, भोकर ११४, बिलोली १६२, देगलूर १७, धर्माबाद १३७, हदगाव ३७८, हिमायतनगर ९१०, कंधार ८७, किनवट १९१, लोहा २५४, माहूर ७२, मुखेड ७९, मुदखेड २१७, नायगाव २, नांदेड ४९, तर उमरी तालुक्यात ५५ शेतकऱ्यांची ई-केवायसी प्रलंबित आहे.
या महिन्यात मिळणार १६ वा हप्ताशेतकऱ्यांना पीएम किसान सन्मान योजनेचा १६ वा हप्ता फेब्रुवारी महिन्यात मिळणार आहे. याशिवाय जे शेतकरी पीएम किसानसाठी पात्र आहेत, अशा शेतकऱ्यांना राज्य सरकारच्या नमो पेन्शन योजनेचाही लाभ मिळेल. सदर योजनेसाठी महसूल विभागाकडून लँड फिडिंगचे काम केले जाते, तर ग्रामविकास विभागाकडून मयत लाभार्थ्यांची माहिती कृषी विभागाकडे दिली जाते, तर ही योजनेची कृषी विभागाकडून अंमलबजावणी केली जात आहे.
पोस्ट ऑफिसमध्ये खाते काढावेशेतकऱ्यांनी आधार फिडिंग केवायसी डीबीटी अकाउंट काढून घ्यावे, अन्यथा लाभापासून वंचित राहावे लागेल. शक्यतोवर पोस्ट ऑफिसमध्ये खाते काढावे.- भाऊसाहेब बरहाटे, जिल्हा कृषी अधीक्षक, नांदेड.