सुनील चौरे । लोकमत न्यूज नेटवर्कहदगाव : लोकसभा निवडणूक २०१९ मध्ये होणार असली तरी हिंगोली लोकसभा मतदारसंघातून कोण निवडणूक लढविणार? याची चर्चा आतापासूनच सुरु झाली आहे. विविध पक्षांतून ‘आयाराम- गयाराम’ केलेले माजी मंत्री सूर्यकांता पाटील, माजी खा. सुभाष वानखेडे, माजी खा. शिवाजी माने निवडणुकीची तयारी करीत आहेत.माजी खा. सुभाष वानखेडे १५ वर्षे आमदार आणि एकदा खासदार होते. मागील लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे खा. राजीव सातव यांनी त्यांचा निसटता पराभव केला होता. आमदार आणि खासदारकीच्या काळात वानखेडे यांनी भाजपाचे कमळ मतदारसंघात फुलू दिले नव्हते तर हिंगोली, वसमत, उमरखेड, महागावमध्येही त्यांनी आपला वरचष्मा ठेवला. दरम्यान, त्यांना पक्षातून विरोध वाढल्याने त्यांनी शिवसेनेला ‘जय महाराष्ट्र’ करुन भाजपामध्ये प्रवेश करुन खासदारकी लढविली मात्र यात त्यांना पराभव स्वीकारावा लागला. काँग्रेस- राष्ट्रवादीच्या महाआघाडीत हिंगोली लोकसभा मतदारसंघ राष्ट्रवादीकडे होता. राजीव सातव यांनी दिल्लीशी असलेल्या संबंधाचा फायदा घेऊन काँग्रेसकडे हा मतदारसंघ सोडवून घेतला. याबदल्यात उस्मानाबाद राष्ट्रवादीला सोडण्यात आला होता. त्यामुळे माजी केंद्रीय मंत्री सूर्यकांता पाटील संतापून भाजपात प्रवेश केला. यापूर्वी काँग्रेसच्या आमदार, नांदेडच्या खासदार नंतर राष्ट्रवादीत केंद्रीय ग्रामविकास मंत्रिपद त्यांना मिळाले. दोनदा खासदारकी मिळविल्यानंतरही त्यांना पुन्हा २०१९ ची लोकसभा निवडणूक आठवून तशी ‘फिल्डिंग’ लावणे त्यांनी सुरु केली आहे. एकीकडे सुभाष वानखेडे आणि दुसरीकडे सूर्यकांता पाटील यांच्यात उमेदवारीसाठी स्पर्धा सुरु असताना यात शिवाजीराव माने यांच्याही नावाची चर्चा सुरु झाली. शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी व्हाया भाजप असा राजकीय प्रवास माने यांचा झाला. अॅड़शिवाजीराव जाधव यांचीही तयारी सुरु आहे. काँग्रेसकडून विद्यमान खा. राजीव सातव मुख्य दावेदार असले तरीही माजी आ. माधवराव पाटील जवळगावकर त्यांना पर्याय ठरु शकतात. निवडणुकीत युती न झाल्यास शिवसेनेकडून जिल्हाप्रमुख बाबूराव कदम, वसमतचे आ. जयप्रकाश मुंदडा यांच्याही नावाची चर्चा सुरु आहे.
‘आयाराम-गयारामांना’ लोकसभेचे डोहाळे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2017 12:47 AM