नांदेड :
राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेत कन्याकुमारीपासून ११८ भारतयात्री सहभागी झाले आहेत. त्यामध्ये नाशिक रोड येथील एका तरुणीचा समावेश आहे. आतिषा पैठणकर असे तिचे नाव. तिला तीन वर्षांच्या प्रयत्नानंतर एअर इंडियात नोकरी मिळाली. ७ सप्टेंबरला तिचे जॉइनिंग होते. परंतु त्याच दिवशीभारत जोडो यात्रेला सुरुवात होणार होती. एका हातात नोकरीचे पत्र अन् दुसऱ्या हातात भारत जोडोचे पत्र अशा द्विधा मनस्थितीत असताना, तिने नोकरीवर पाणी सोडत भारत जोडो यात्रेत सहभागी होण्याचा निर्णय घेतला.
आतिषाचे कुटुंबीय मध्यमवर्गीय. घरात आई-वडील, भाऊ शिक्षण घेतोय तर मोठी बहीण वर्क फ्रॉम होम करते. आतिषाने इलेक्ट्रिकमध्ये इंजिनिअरिंग केले आहे. आतिषानेही तब्बल तीन वर्षे एअर इंडियातील नोकरीसाठी प्रयत्न केले. एअर इंडियाने तिची मुलाखत घेतल्यानंतर ७ सप्टेंबरला तिला नोकरीवर रुजू होण्याचे पत्र पाठविले. तर इकडे आतिषाने भारत जोडो यात्रेत भारतयात्रीसाठी म्हणूनही मुलाखत दिली होती.
६ सप्टेंबरला ती कोलकाता येथे जाण्यासाठी मुंबई विमानतळावर पोहचली. परंतु नोकरी की भारत जोडो यापैकी कशाची निवड करायची? याबाबत तिच्या मनात द्वंद्व सुरू होते. अखेर तिने नोकरीवर पाणी सोडत भारत जोडो यात्रेत सहभागी होण्याचा निर्णय घेतला. आई-वडिलांना ही बाब कळाल्यानंतर त्यांच्या रोषाचा सामनाही करावा लागला. परंतु एक महिन्यात परत येऊन पुन्हा नोकरी करेल, असा शब्द तिने दिला. आईवडिलांच्या होकारानंतर आतिषाने थेट कन्याकुमारी गाठले.
नव्या भारतासाठी भारत जोडो यात्रा महत्त्वाची आहे. त्यातून देशभरातील तरुणाईशी संवाद साधण्याची संधी मिळाली, त्यांचे प्रश्न, अडचणी समजल्या. अनुभवाची ही शिदोरी पुढील आयुष्यात मोलाची ठरणार आहे. - आतिषा पैठणकर