नांदेड : रेल्वेच्या विविध प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी आज नांदेड विभागीय रेल्वे व्यवस्थापक कार्यालयात वार्षिक बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. बैठकीला निमंत्रित बारा पैकी पाच खासदारांनी उपस्थिती लावली. अन्य सात खासदारांनी या बैठकीकडे पाठ फिरविली़
दक्षिण मध्य रेल्वेच्या वतीने नांदेड विभागातील रेल्वे संबंधित मागण्या, प्रश्न आदी विषयावर चर्चा करून ते खासदारांच्या संमतीने रेल्वे बोर्डाकडे पाठविण्यासाठी दरवर्षी बैठक घेण्यात येते़ दरम्यान, मागील वर्षातील बैठक नोव्हेंबर २०१७ मध्ये घेण्यात आली होती़ सदर बैठक उशिरा बोलावल्याने खासदारांनी रोष व्यक्त केला होता़ यंदा ही बैठक सप्टेंबर महिन्यातच बोलावण्यात आली आहे़ दमरेचे महाव्यवस्थापक विनोदकुमार यादव यांच्या उपस्थितीत दुपारी २ वाजता या बैठकीस सुरुवात झाली आहे़
यावेळी माजी मुख्यमंत्री खा़ अशोकराव चव्हाण, परभणीचे संजय जाधव, औरंगाबादचे चंद्रकांत खैरे, अकोल्याचे संजय धोतरे या चारच खासदारांनी उपस्थिती दर्शविली आहे़. हिंगोलीचे खासदार राजीव सातव यांनी उशिरा बैठकीस उपस्थिती लावली. दरम्यान निमंत्रितांपैकी जालन्याचे रावसाहेब दानवे, वाशिमच्या भावनाताई गवळी, अमरावतीचे आनंदराव आडसूळ, दिंडोरीचे हरिश्चंद्र चव्हाण, मध्यप्रदेश खांडवाचे खा़नंदकुमार सिंघ चौव्हाण, लातूरचे डॉ़सुनील गायकवाड, राज्यसभा खा़ राजकुमार धुत या खासदारांनी बैठकीकडे पाठ फिरविली आहे़