नांदेड : नीट आणि सीईटी परीक्षेचा निकाल नुकताच लागला आहे़ यंदा दरवर्षीपेक्षा निकालाचा टक्का घसरला आहे़ त्यामुळे पाल्यासह पालकही हैराण झाले आहेत़ त्यात अभियांत्रिकी, वैद्यकीय, फार्मसी या अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी यावर्षी पासून सार या पोर्टलवर आॅनलाईन नोंदणीचा नियम घालून देण्यात आला़ १७ ते २१ जूनदरम्यान ही नोंदणी करणे आवश्यक आहे़ परंतु गेल्या दोन दिवसांपासून हे पोर्टलच बंद आहे़ त्यामुळे पालक आणि विद्यार्थी गोंधळात पडले आहेत़नीट आणि सीईटी परीक्षेसाठी जिवाचे रान केलेल्या पाल्य आणि पालकवर्गाची आता वेगवेगळ्या अभ्यासक्रमाला प्रवेशासाठी धडपड सुरु आहे़ यापूर्वी वेगवेगळ्या विषयांसाठी वेगवेगळ्या प्रकारे नोंदणी करण्यात येत होती़ या वर्षीपासून मात्र शासनाने सार या एकाच पोर्टलवर सर्व अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी नोंदणी करण्यास सुरुवात केली़या पोर्टलवर अभियांत्रिकी, वैद्यकीय, कृषी यासह इतर वेगवेगळ्या अभ्यासक्रमासाठी वेगवेगळ्या लिंक देण्यात आल्या आहेत़ त्याचबरोबर नोंदणी करताना तब्बल ६८ प्रकारची कागदपत्रे गोळा करीत आहेत़ प्रत्यक्षात कोणत्या अभ्यासक्रमासाठी किती कागदपत्रे आवश्यक आहेत़ याबाबत गोंधळच आहे़ याची नेमकी माहिती सेतू किंवा संबंधित विभागालाही नाही़ यापूर्वी केवळ ८ ते १० कागदपत्रे उपलब्ध करुन दिल्यानंतर नोंदणी होत होती़ इतकी कागदपत्रे गोळा करताना विद्यार्थ्यांची दमछाक होत आहे़प्रवेश नोंदणीच्या प्रक्रियेबाबत सर्वच अनभिज्ञ१७ ते २१ जूनदरम्यानच ही नोंदणी करण्याची मुदत आहे़ त्यात गेल्या दोन दिवसांपासून हे सर्व्हर बंदच आहे़ शासनाकडून तसे स्पष्टही करण्यात आले आहे़ त्यात आता नोंदणीसाठी केवळ तीन दिवस उरले आहेत़ यापूर्वी नोंदणीसाठी किमान पंधरा ते वीस दिवसांचा कालावधी दिला जात होता़ यावर्षी त्यामध्येही कपात करण्यात आली आहे़ त्यावर पोर्टलही बंद असल्यामुळे नोंदणी कशी करायची ? असा प्रश्न आहे़आॅनलाईन प्रवेश प्रक्रियेसाठी मुदतवाढस्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ परिसरातील सर्व शैक्षणिक संकुले, उपकेंद्र लातूर आणि परभणी तसेच न्यू मॉडेल डिग्री कॉलेज, हिंगोली येथील विविध अभ्यासक्रम प्रवेशप्रक्रिया आॅनलाईन पद्धतीने राबविण्यात येत आहे. विद्यार्थ्यांना आॅनलाईन नोंदणी करण्याकरिता शुक्रवार, २१ जून पर्यंत मुदतवाढ देण्यात आल्याचे विद्यापीठाचे कुलसचिव डॉ.रमजान मुलाणी यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.विद्यार्थी आणि पालकांच्या मागणीवरून मुदतवाढ देण्यात येत असून विद्यापीठ परिसरातील सर्व शैक्षणिक संकुले, उपकेंद्र लातूर आणि परभणी तसेच न्यू मॉडेल डिग्री कॉलेज, हिंगोली येथील विविध अभ्यासक्रम प्रवेशाबाबतची सूचना आणि माहितीपत्रक विद्यापीठ संकेतस्थळावर उपलब्ध आहेत़
पालक अन् विद्यार्थ्यांचा गोंधळ- प्रवेश नोंदणीसाठी असलेले सार पोर्टल गेल्या दोन दिवसांपासून बंद आहे़ अनेकवेळा प्रयत्न केल्यानंतरही ते सुरु झाले नाही़ त्यात आता नोंदणीसाठी केवळ तीन दिवस उरले आहेत़ नोंदणीसाठीची माहिती सेतू केंद्रांनाही नाही़ त्यामुळे सर्वत्र गोंधळाचे वातावरण आहे़ अगोदरच तणावात असलेले पालक आणि विद्यार्थी या प्रकारामुळे आणखी हैराण झाले आहेत़ - ब्राईट एज्युकेशनचे ताहा़