नांदेड : गणवेशाच्या रक्कमेसाठी राष्ट्रीयीकृत बँकेत खाते उघडण्यासाठी पालक, विद्यार्थ्यांसह शिक्षकांमध्ये उडालेल्या गोंधळाला पोस्टल बँकिंगने पूर्णविराम दिल्याचे चित्र पहायला मिळत आहे़ जिल्ह्यात आजपर्यंत ६५ हजारांहून अधिक विद्यार्थ्यांनी पोस्टात खाते उघडले असून बहुतांश विद्यार्थी, विद्यार्थिनींना त्यांच्या गणवेशाची रक्कम पोस्टामार्फत मिळाली आहे़
शालेय विद्यार्थ्यांना गणवेश देण्याऐवजी त्यासाठी लागणारी रक्कम थेट विद्यार्थ्यांच्या खात्यात जमा करण्याचा निर्णय शासनाने घेतला़ यानंतर शालेय विद्यार्थ्यांसह पालकांची बँकेत खाते उघडण्यासाठी लगीनघाई सुरू झाली़ दरम्यान, आधारकार्ड तसेच लिंकिंंगच्या अडचणी आदी तांत्रिक कारणामुळे तसेच पालकांच्या उदासीनतेमुळे बहुतांश विद्यार्थ्यांची खाती उघडली गेली नाहीत़ गणवेशासाठी मिळणारे ४०० रूपये मिळविण्यासाठी बँकेत खाते उघडण्यासाठी १००० रूपये, पालकाचा एक ते दोन दिवसांचा वेळ, त्यातून बुडणारा त्यांचा रोजगार, सोबत विद्यार्थी लागत असल्याने विद्यार्थ्यांची शाळा बुडणार आणि गाव, वाडी, वस्तीनजीक बँक नसेल तर परगावात जिथे बँक असेल तिथे जाण्यासाठी लागणारा खर्च आदीमुळे बहुतांश पालकांनी गणवेशाचे पैसे सोडून देण्याचाच निर्णय घेतला़ परंतु, त्यामुळे जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थी शालेय गणवेशापासून वंचित राहत असल्याची विरोधी पक्ष आणि संघटना, पालकांकडून टीका होवू लागली दरम्यान, पोस्टाने सुरू केलेल्या पोस्टल बँकिंगमुळे विद्यार्थी, पालकांच्या पैशासह वेळेची बचत होत आहे़ पोस्टामध्ये खाते उघडण्यासाठी केवळ ५० रूपये लागत आहेत़ त्याचबरोबर पोस्टात पालक अथवा विद्यार्थ्यांना येण्याची गरज पडत नाही़ तसेच खाते उघडल्यानंतर गणवेशाची जमा झालेली रक्कम विद्यार्थ्यांना घरपोच अथवा शाळेत पोस्ट कर्मचार्यांमार्फत आणून दिली जात आहे़ त्यामुळे गणवेशासाठीचे खाते पोस्टात उघडण्याचा सपाटा लागला आहे़ १ एप्रिलपासून आजपर्यंत जवळपास ६५ हजार विद्यार्थ्यांनी खाते पोस्टात उघडले़
दरम्यान, आर्थिकदृष्ट्या मागास घटक, अनुसूचित जाती जमाती प्रवर्ग, अल्पसंख्याकांना मिळणारी शिष्यवृत्ती पोस्टामार्फत उचलता येते़ त्यांचे हे खाते बँकेच्या सर्व प्रकारच्या व्यवहारासाठी वापरता येत असल्याने विद्यार्थ्यांचा कल पोस्टाकडे वाढला आहे़ मुख्य कार्यकारी अधिकार्यांनी शिक्षण विभागास पत्र लिहून शालेय गणेवश रक्कम जमा करण्यासाठी विद्यार्थ्यांचे पोस्टात खाते उघडण्याच्या सूचना केल्या होत्या. शाळेमार्फत एकाचवेळी अनेक विद्यार्थ्यांचे खाते काढण्यासाठी पुढाकार घेण्यात आला तर आमचे कर्मचारी त्या शाळेत अर्ज भरून घेवून विद्यार्थ्यांचे खाते उघडतील़ गणवेश, शिष्यवृत्तीची रक्कम विद्यार्थ्यांना घरपोच अथवा शाळेत दिली जाईल़ पोस्टात विद्यार्थ्यांची खाते उघडण्यास कोणी टाळाटाळ करीत असेल तर संपर्क साधावा, असे आवाहन डाक अधिक्षक एस़ एम़ अली यांनी केले़
मुख्याध्यापकांचा पुढाकार महत्वाचाशाळेतील किती विद्यार्थ्यांचे बँकेत खाते नाही, गणवेशाची रक्कम विद्यार्थ्यांना मिळालेली नाही अशा सर्वांचे एकत्रित अर्ज पोस्ट कर्मचारी, कार्यालयात दिले तर त्यांचे एकाच वेळी खाते उघडणे सोयीचे होईल़ तसेच पोस्ट कर्मचार्यांना शाळेत येवून विद्यार्थ्यांचे अर्ज, कागदपत्र गोळा करणे सोपे होईल़ मुख्याध्यापक, शिक्षकांनी पुढाकार घेवून पोस्टाशी संपर्क साधल्यास येणार्या २६ जानेवारीपर्यंत सर्व विद्यार्थ्यांना गणेवश रक्कम मिळण्यास सुलभ होईल़