नांदेड : माळाकोळी ठाण्यांतर्गत २००६ मधील एका गुन्ह्यात फरार असलेल्या आरोपीस अहमदपूर तालुक्यातील सलगरा येथून स्थानिक गुन्हा शाखेने जेरबंद केले आहे. त्याला माळाकोळी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
लोहा तालुक्यातील माळाकोळी पोलीस ठाण्यांतगर्गत २००६ मधील एका गुन्ह्यात विनायक प्रकाश शिंदे हा आरोपी फरार होता. फरार असलेल्य आरोपींचा शोध घेवून त्यांना अटक करण्याबाबतचे निर्देश पोलीस अधीक्षक प्रमोद शेवाळे यांनी स्थानिक गुन्हा शाखेला दिले होते. त्यानुसार स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरीक्षक द्वारकादास चिखलीकर यांनी वेगवेगळे पथके तयार केली होती.
या पथकातील पोहेकाॅ गुंडेराव करले यांना एक आरोपी अहमदपूर तालुक्यात असल्याची माहिती मिळाली होती. या माहितीनंतर पोलिसांनी अहमदपूर तालुक्यातील सलगरा येथून विनायक प्रकाश शिंदे याला पकडले. हा आरोपी गुन्हा घडल्यापासून तब्बल १४ वर्षांपासून फरार होता. त्याला माळाकोळी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. पोलीस अधीक्षक शेवाळे, अप्पर पोलीस अधीक्षक निलेश मोरे, विजय कबाडे, पोलीस निरीक्षक चिखलीकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई स्थानिक गुन्हा शाखेचे पोहेकाॉ करले, अफजल पठाण, पो.ना. देवा चव्हाण, पो.कॉ. रवि बाबर, पोकॉ हेमंत बिचकेवार यांनी पार पाडली.