लोकमत न्यूज नेटवर्क नांदेड : राज्यभरात गाजलेल्या कृष्णूर धान्य घोटाळ्यात सर्वच आरोपींना जामीन मिळाला आहे. परंतु या प्रकरणात आता ईडीने एन्ट्री करून इंडिया मेगा ॲग्रो अनाज कंपनीचे मालक अजय बाहेती यांना अटक केली आहे. त्यामुळे घोटाळ्यातील इतर आरोपींचे धाबे दणाणले असून अनेकजण भूमिगत झाले आहेत.
१८ जुलै २०१८ रोजी तत्कालीन पोलिस अधीक्षक चंद्रकिशाेर मीणा यांच्या पथकाने सापळा रचून शासकीय धान्याचा काळाबाजार होत असताना दहा ट्रक पकडले होते. या ट्रकमध्ये शासकीय वितरण व्यवस्थेचा शिक्का असलेली सहा हजार पोती आढळून आली होती. या प्रकरणात पंधरा जणांविरुद्ध गुन्हा नोंदविला होता. त्यात धान्य व्यापारी, पुरवठादार, शासकीय अधिकारी यांच्यासह अनेकांचा सहभाग आढळला. त्यांनतर हर्सूल कारागृहात असताना त्यांना जामीन मिळाला. त्यानंतर हे प्रकरण शांत झाले होते. या प्रकरणात तत्कालीन पुरवठा अधिकारी संतोष वेणीकर हे फरार आहेत. परंतु दोन दिवसांपूर्वी अचानक ईडीने या प्रकरणात एन्ट्री घेतली. अजय बाहेती यांना अटक करून आठ दिवसांची कोठडी सुनावली. त्यामुळे घोटाळ्यात सहभागी इतर आरोपींचे धाबे दणाणले आहेत.
धान्याचा काळाबाजार अजून सुरूचराज्यभरात कृष्णूरच्या घोटाळ्याने नांदेडची बदनामी झाली. पोलिसांनी अनेकांना अटक केली. मात्र धान्याच्या काळाबाजारात नवीन पिढी उतरली आहे. ग्रामीण भागात काही जणांचे गोदाम असून तेथून धान्याची विल्हेवाट लावली जाते, अशी माहिती आहे.