१०१ रोपट्यांची लागवड
नांदेड : भारतीय स्टेट बँकेच्या वर्धापन दिनानिमित्त नवीन मोंढा शाखेच्यावतीने १०१ वृक्षारोपण व वाटप करण्यात आले. शाखेच्यावतीने एक शाळा दत्तक घेऊन वृक्षारोपण करण्यात येणार आहे. यावेळी मुख्य व्यवस्थापक अशोक गुप्ता, आदर्श विद्यालयाचे मुख्याध्यापक रामतीर्थे, झंवर, शाखाधिकारी शाहू, वरूणकुमार, मधुकर उमरे, शंकर कदम, स्मिता नादरे, कल्पना बाबळगावे आदींची उपस्थिती होती.
पारेकर यांचा सत्कार
नांदेड : येथील शिवाजी हायस्कूलचे शिक्षक नारायणराव पारेकर हे नियतवयोमानानुसार सेवानिवृत्त झाले असता, त्यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला. विष्णूनगर येथील आई तुळजाभवानी मंदिरात झालेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी महापौर बलवंतसिंघ गाडीवाले, तर माडेवार, सभापती विरेंद्रसिंघ गाडीवाले, प्रा. रामशेट्टे आदींची प्रमुख उपस्थिती होती. सूत्रसंचालन टोकलवाड यांनी केले.
गुणपत्रके, पदवी प्रमाणपत्र केंद्रावरच मिळणार
नांदेड : यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या विविध शिक्षणक्रमांचे जे विद्यार्थी २०१७ ते २०२० या दरम्यान पदवी प्रमाणपत्र मिळण्यास पात्र झालेले आहेत, त्या विद्यार्थ्यांचे पदवी प्रमाणपत्र विद्यापीठाने संबंधित अभ्यास केंद्राकडे सुपूर्द केले आहे. कोविड काळात प्रवास टाळता यावा म्हणून गुणपत्रके व पदवी प्रमाणपत्रे केंद्रावरच उपलब्ध करून दिली आहेत. कोणतेही शुल्क न भरता पदवी प्रमाणपत्र ताब्यात घ्यावे, असे आवाहन विद्यापीठाने केले आहे.