नांदेड : सार्वजनिक बांधकाम विभागाअंतर्गत करण्यात आलेल्या रस्ते बांधकामातील कोट्यवधींच्या डांबर घोटाळ्यात आतापर्यंत तिघांना अटक झाली असून अद्यापही दोन आरोपी मात्र फरारच आहेत़ सप्टेंबर महिन्यात या प्रकरणात शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता़
रस्ते दुरुस्तीचे काम नांदेडातील सहा कंत्राटदारांना देण्यात आले होते़ या कंत्राटदारांनी शासकीय कंपनीकडून डांबर घेण्याऐवजी ते डांबरशेठ नावाच्या खाजगी व्यक्तीकडून खरेदी केले होते़ अशाप्रकारे जवळपास बारा कोटी रुपयांचा डांबर घोटाळा उघडकीस आला होता़ याप्रकरणी सहाय्यक अभियंता संदीप कोटलवार यांच्या तक्रारीवरुन सहा कंत्राटदारांच्या विरोधात शिवाजीनगर पोलिसांनी ३ सप्टेंबर २०१८ ला गुन्हा नोंदविला होता़ त्याच दिवशी पोलिसांनी भास्कर कोंडा आणि मनोज मोरे या दोघांना अटक केली होती़ तर इतर चार जण फरारच होते.
मध्यंतरी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या पत्रानंतर यातील सतीश देशमुख यांचे नाव वगळले होते़ मात्र इतर तिघे पोलिसांना गुंगारा देत होते़ काही दिवसांपूर्वीच सी़ एस़ संत्रे हा पोलिसांना शरण आला़ तर या प्रकरणातील साईनाथ पद्मावार आणि मोईज करखेलीकर हे मात्र गेल्या पाच महिन्यांपासून फरारच आहेत़ फरार असलेले हे आरोपी पोलिसांना सापडत नसल्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे़ मध्यंतरी त्यांनी जामिनासाठी अर्जही केला होता़ परंतु न्यायालयाने तो अर्ज फेटाळला होता. याबाबत पोलिसांकडून मात्र आरोपींच्या शोधासाठी पथके पाठविण्यात आल्याची माहिती देण्यात येत आहे़