नांदेड - आगामी काळात होणाऱ्या सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर येथील उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयात शहरातील प्रमुख संघटनाचे पदाधिकारी, कार्यकर्ते यांची बैठक घेण्यात आली. या बैठकीत अतिरिक्त पोलीस अधीक्षक नीलेश मोरे यांनी सर्व परवानग्या घेऊनच फलक लावावे अन्यथा कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा दिला. शहराचे विद्रुपीकरण कोणत्याही परिस्थितीत खपवून घेतले जाणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला. सण, उत्सव साजरे करताना जनतेने न्यायालयाच्या निर्णयांचे पालन करावे. याकाळात पूर्वपरवानगीनेच फलक लावावेत. महापालिकेने फलक लावण्यासंदर्भात काही जागा निश्चित केल्या आहेत, त्याचठिकाणी ते लावावे. इतरत्र फलक लावून शहर विद्रुपीकरण करु नये. फलकामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही, याची काळजी घ्यावी. सर्व सण, उत्सव हे शांततेत पार पाडावेत, असे आवाहन केले. या बैठकीला पोलीस उपअधीक्षक विक्रांत गायकवाड, पोलीस निरीक्षक जगदीश भंडरवार, अनिरुद्ध काकडे, महापालिकेचे अजितपालसिंग संधू उपस्थित होते.
शहराचे विद्रुपीकरण केल्यास कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 08, 2021 4:15 AM