शिवाजी राजूरकर।लोकमत न्यूज नेटवर्कनवीन नांदेड : फिटनेस सर्टीफिकेट वैध नसलेल्या जिल्ह्यातील ७८ वाहनांवर परिवहन विभागाच्या वतीने कारवाई करण्यात आली असून, ७८ वाहनांपैकी फक्त १० वाहनधारकांनी १२ आॅक्टोबरपर्यंत तब्बल ७४ हजार ३०० रूपयांचा दंड भरला आहे.मुंबई येथे झालेल्या बैठकीत ‘वैध’ नसलेल्या वाहनांवर कारवाई करण्याकरिता ८ ते २३ आॅक्टोबर या कालावधीमध्ये राज्यातील प्रवासी तथा मालवाहतूक वाहनांची विशेष तपासणी मोहीम राबविण्याचे आदेश देण्यात आले होते़नांदेड येथील प्रादेशिक परिवहन विभागाच्या वतीने जिल्ह्यातही ही विशेष वाहन तपासणी मोहीम राबविण्यात येत आहे. जिल्ह्यातही विशेष वाहनांची तपासणी मोहीम यशस्वी करण्यासाठी दोन भरारी पथकांची नियुक्ती करण्यात आली असून, दोन पथकांत चार अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मोहिमेसाठी नियुक्त केलेल्या विशेष पथकात मोटार वाहन निरीक्षक बी. ए. प्रधान व सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक किरण डोंगरे तर दुसºया विशेष पथकात मोटार वाहन निरीक्षक पी. एस. घाटोळे व सहा. मोटार वाहन निरीक्षक साधना एन. दुधमले हे आहेत़या मोहिमेत ६८ वाहनधारकांनी त्यांच्या दंडात्मक रकमेचा भरणा केला, तर प्रादेशिक परिवहन विभागास ४ ते ५ लाख रूपयांचा महसूल प्राप्त होणार असल्याची अपेक्षाही उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अविनाश राऊत यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केली आहे.दरम्यान, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अविनाश पी. राऊत यांनी, फिटनेस प्रमाणपत्र वैध नसलेल्या वाहनधारकांनी त्यांच्या वाहनांचे फिटनेस म्हणजेच योग्यता प्रमाणपत्र नूतनीकरण केल्याशिवाय ते वाहने रस्त्यावर चालवू नयेत, असे आवाहन केले.याशिवाय, तपासणी मोहिमेअंतर्गत परिवहन कार्यालयात व विविध ठिकाणच्या दुरूस्ती केंद्रात अटकवून ठेवलेल्या वाहनधारकांनी आपापली वाहने दुरूस्तीनंतर आणि योग्यता प्रमाणपत्र नूतनीकरणानंतर रस्त्यावर चालवावीत, असे आवाहन अविनाश राऊत यांनी यावेळी केले.
नवीन नांदेड ७८ वाहनांवर आरटीओंची कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 13, 2018 1:09 AM