नांदेड : जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागात जानेवारी २0१४ पासून झालेल्या बदल्यांची चौकशी करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या समितीने दिलेल्या अहवालावर निश्चितपणे कारवाई केली जाईल, असे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिमन्यू काळे यांनी स्पष्ट केले. अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी गुलाब राठोड यांच्या अध्यक्षतेखालील समितीने अहवाल सादर केल्याचे सोमवारी मुख्य कार्यकारी अधिकारी काळे यांनी सांगितले. या अहवालातील निष्कर्ष आणि त्यावरील कारवाईसंदर्भात शिक्षण विभागाचेच मार्गदर्शन घेतले जाईल असेही काळे यांनी स्पष्ट केले. शिक्षण विभागच एखाद्या चुकीची काय शिक्षा राहील हे सांगू शकेल. त्यामुळे या अहवालातील निष्कर्षाचे अवलोकन करून त्या सूचवाव्यात असे शिक्षण विभागातील अधिकार्यांना सांगितले आहे. सध्या असलेल्या नियमांनुसार कारवाई करण्यात येणार आहे. त्यामुळे आणखी काही दिवस गेले तरी या प्रकरणात कारवाई मात्र होणार आहे असे ते म्हणाले. जिल्हा परिषदेत शिक्षण विभागात तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी सुमंत भांगे यांच्या स्वाक्षरीचे बोगस बदली आदेश उघडकीस आले होते. या प्रकरणात २0 शिक्षकांवर गुन्हेही दाखल करण्यात आले आहेत. या प्रकारानंतर जिल्हा परिषदेत जानेवारी २0१४ पासून झालेल्या सर्वच बदल्यांची चौकशी करण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी काळे यांनी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकार्यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन केली होती./(प्रतिनिधी) शिक्षकांच्या बदलीसाठी सदस्यांचाही 'आग्रह'जि.प. शिक्षकांच्या बदल्या या पदाधिकार्यांच्या शिफारशींहून झाल्याचे अहवालात नमूद केले आहे. त्यासोबतच अनेक जि.प. सदस्यांनीही काही शिक्षकांच्या बदल्यांचा आग्रह केल्याची बाब पुढे आली आहे. त्यामुळे 'आग्रह' धरणारे सदस्य कोण? याबाबतही चर्चा सुरू झाली आहे.
बदली प्रकरणात कारवाई तर होणारच
By admin | Published: February 03, 2015 5:11 PM