मराठा आरक्षणाबाबत राज्य आणि केंद्र शासनाच्या विरोधात आंदोलनाची पुढील दिशा ठरविण्यासाठी छावाचे केंद्रीय अध्यक्ष नानासाहेब जावळे हे नांदेडात आले होते. त्यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधला. तत्पूर्वी लोह्यात आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याच्या कुटुंबीयांची त्यांनी सांत्वनपर भेट घेतली. त्यानंतर पत्रकार परिषदेत ठाेक मोर्चाबाबत माहिती देऊन आजच आपण गोदावरीत जलसमाधी घेणार असल्याचे जाहीर केले. त्यांनी अचानक घेतलेल्या निर्णयामुळे पोलिसांची धांदल उडाली होती. दरम्यान, छावा कार्यकर्ते गोदाकाठी पोहोचण्यापूर्वीच गोवर्धन घाट पूल आणि कौठा परिसरात तगडा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. पत्रपरिषदेनंतर गोदावरी नदीकडे निघालेल्या छावा कार्यकर्त्यांच्या गाड्यांचा ताफा गोवर्धन घाट पुलावर पोलिसांनी अडविला. परंतु, कार्यकर्त्यांचा रोष पाहून त्यांना पुढे जाऊ देण्यात आले. तद्नंतर कौठा गावातून नदीपात्रात उतरण्याची ठिकाणी छावाचे अध्यक्ष नानासाहेब जावळे, भीमराव मराठे, विद्यार्थी आघाडी प्रदेशाध्यक्ष विजय घाडगे, प्रदेशाध्यक्ष पंजाबराव काळे, मराठा महासंघाचे प्रदेशाध्यक्ष राजकुमार सूर्यवंशी, बलवंत माखणे, जिल्हाध्यक्ष दशरथ कपाटे, माधव ताटे, परमेश्वर जाधव, स्वप्नील पाटील, तानाजी पाटील, निखिल गिरडे, गुलाबराव जाधव, संतोष कवळे, मुस्लीम आघाडीचे जिल्हाध्यक्ष सत्तार पठाण यांच्यासह ७० ते ८० कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेऊन सोडून दिले.
आता मूक नाही, तर ठोक आंदोलन
मराठा आरक्षणावरून सुरू असलेले राजकारण लज्जास्पद असून, या राजकर्त्यांना मूक मोर्चाची भाषा समजत नसेल तर भविष्यात छावा ठोक मोर्चे काढेल, असा इशारा अखिल भारतीय छावा संघटनेचे केंद्रीय अध्यक्ष नानासाहेब जावळे यांनी दिला. नांदेड येथे आले असताना त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. जावळे म्हणाले, प्रत्येक पक्ष आरक्षणाच्या बाजूने असताना पाणी कुठे मुरतेय हे समजत नाही. केवळ मराठा, मुस्लीम आणि इतर समाजात वाद घडवून आणण्याचे काम नेतेमंडळी करत आहे. आजपर्यंत आरक्षणावरूनच मराठा समाजाला राजकीय हेतुसाठी वापरण्यात आले. त्यामुळे आगामी काळात मूक मोर्चा नाही तर शासनकर्त्यांना ठोकून काढण्यासाठी छावा ठोक मोर्चे काढेल, असा इशारा जावळे यांनी दिला.