लोकमत न्यूज नेटवर्कधर्माबाद : धर्माबाद तालुका हा राज्याचे शेवटचे टोक असल्यामुळे शासन व लोकप्रतिनिधींच्या दुर्लक्षामुळे अनेक समस्या प्रलंबित आहेत़ त्यामुळे सरपंच संघटनेचे तालुकाध्यक्ष बाबूराव पाटील कदम यांनी तेलंगणा राज्यातील लोकप्रतिनिधींची भेट घेवून धर्माबाद तालुक्याचा भाग तेलगंणात समावेश करण्याची लेखी मागणी केली आहे़ या मागणीमुळे खळबळ उडाली आहे़धर्माबाद हे शहर तेलगंणाच्या राज्याच्या सीमेवर आहे़ ६० टक्के जनता तेलगू भाषिक असून खरेदी विक्रीसाठी व्यापारी, शेतकरी, शेतमजूर तेलगंणात ये-जा करतात़ महाराष्ट्र शासनाच्या विविध योजनेपेक्षा तेलगंणातील योजना अनेक पटींनी चांगल्या असल्याचे मत तालुक्यातील जनतेचे झाले आहे़ खरीप व रबी हंगामात शेतकऱ्यांना पेरणीसाठी एकरी चार हजार रूपये शासन देत आहे.सदरील योजना महाराष्ट्र शासनानेही राबविण्याची मागणी मराठवाडा जनता विकास परिषदेच्या वतीने मुख्यमंत्र्यांकडे केली आहे़ तसेच बाभळी बंधाºयाच्या बांधकामासाठी महाराष्ट्र शासनाने २२५ कोटी रूपये खर्च करून बंधारा बांधला़ मात्र हा बंधारा फक्त शोभेची वास्तु बनला आहे.महाराष्ट्रातील रस्ते व तेलगंणातील रस्ते यामध्येही जमीन अस्मानचा फरक आहे. निजामाच्या काळात धर्माबाद तालुक्याचा संपूर्ण भाग मुधोळ मंडळमध्ये समावेश होता. आजही जुनी कागदपत्रे मुधोळ तहसीलमधून नागरिक काढून आणत आहेत. योजनांच्या अंमलबजावणीबाबतही तेलंगणा सरस असल्याची चर्चा आहे़ त्यामुळे शिवसेनेचे माजी तालुकाप्रमुख तथा सरपंच संघटनेचे तालुकाध्यक्ष बाबूराव पाटील कदम, शंकू पाटील होट्टे यांनी निझामाबादचे आ़ बाल रेड्डी, खा. कविता यांच्याकडे लेखी मागणी करून जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींची झोप उडवली आहे.आगामी विधानसभेच्या तयारीसाठी सर्वच राजकीय पक्षांनी हालचाली सुरू केल्या आहेत. परंतु, सदरील मागणीमुळे जनतेत जोरदार चर्चा सुरू आहे. अनेकांनी या मागणीचे स्वागतही केले आहे़ तर काही मात्र विरोधात आहेत़ लवकरच तेलगंणाच्या मुख्यमंत्र्यांना भेटण्यासाठी शिष्टमंडळ जाणार असून यात सर्वच राजकीय पक्षांचे काही पदाधिकारी व लोकप्रतिनिधींचा सहभाग राहणार असल्याची प्रतिक्रियाही देण्यात आली़---धर्माबाद हे तेलंगणात समाविष्ट होणे शक्य नसून भाषेची व इतर गोष्टींची समस्या निर्माण होते़ केवळ योजनेसाठी राज्य बदलणे योग्य नाही, त्यापेक्षा तेलंगणातील योजना महाराष्ट्र सरकारने राबवावे हे महत्त्वाचे आहे़ तेलंगणात आताच्या मुख्यमंत्र्यांसारखे भविष्यात मुख्यमंत्री राहतील काय? -गणेशराव पा़ करखेलीकर, माजी सभापती, कृउबा समिती़---धर्माबाद तेलंगणात जाऊ शकत नाही ही स्टंटबाजी आहे़ धर्माबाद हे तेलंगणाच्या सीमेवर असल्याने महाराष्ट्र सरकार दुर्लक्ष करीत आहे़ तेलंगणात जाण्यापेक्षा राज्य सरकारवर दबाव आणून विकासाचे मुद्दे मांडणे योग्य राहील -विनायकराव कुलकर्णी, उपनगराध्यक्ष़