बी़ व्ही़ चव्हाण।उमरी : तालुक्यातील गोळेगाव या केंद्रीय जिल्हा परिषद शाळेने सोयीसुविधा, नवनवीन उपक्रम आणि गुणवत्तेने जिल्ह्यात एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. एखाद्या दर्जेदार इंग्रजी शाळेलाही लाजवेल अशी दिमाखदार दुमजली इमारत, ज्ञानरचनावादी आरेखने, रंगरंगोटीने सुशोभित, निसर्गरम्य वातावरण, डिजिटल वर्ग, सीसीटीव्ही कॅमेरे, वाय-फाय इंटरनेट सेवा उपलब्ध करून खऱ्या अर्थाने ग्रामीण भागातील गोरगरीब मुलांच्या स्वप्नांना प्रगतीचे पंख देण्याचे काम या शाळेतील उच्चश्रेणी मुख्याध्यापक यु.जी. कदम आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी केले आहे.शाळेला उपलब्ध करून दिलेल्या भौतिक सुविधेसह विद्यार्थ्यांच्या ज्ञानाला तंत्रज्ञानाची सांगड घालून गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यासाठी सदैव झगडणारे मुख्याध्यापक कदम व सर्व सहकारी आणि शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सर्व सदस्यांचे परिश्रम महत्त्वाचे आहेत. या सर्व उपक्रमांबरोबरच चालू वर्षी नावीन्यपूर्ण विज्ञान केंद्र आणि विद्यार्थ्यांची किड्स बँक सुरू करून ही शाळा जिल्ह्यातील सर्व शाळांसाठी प्रेरणास्त्रोत ठरली आहे. खेड्यामध्ये आधुनिकतेचे कसलेही वातावरण नसताना येथील शिक्षकांनी अत्यंत चिकाटीने, जिद्दीने व दिवस-रात्र मेहनत घेऊन या विद्यार्थ्यांना घडविण्याचा प्रयत्न केला. म्हणूनच शाळेतील विद्यार्थ्यांचा गुणात्मक दर्जा ठळकपणे दिसून आला . नेमकी हीच बाब पालकांना भावली व शाळेचा पुढील विकास सुरू झाला. सांस्कृतिक सोहळ्याचे थेट प्रक्षेपण यू ट्यूबवर करण्यात आले होते. समाजमाध्यमावर शेकडो लोकांनी या कार्यक्रमाला पसंती दिली. यामुळे विद्यार्थ्यांचे कौतुक होत आहे.सकस आहार व मनोरंजनात्मक खेळगोळेगाव सर्कल दुष्काळी भाग असल्यामुळे शेतकरी व शेतमजुरांच्या मुलांना सकस पौष्टिक आहार मिळावा म्हणून यावर्षी सुट्यातील सुमारे ४५ दिवस सकस आहार पुरविण्यात आला. त्याचबरोबर शाळेमध्ये कॅरम, बुद्धिबळ इत्यादी मनोरंजनात्मक खेळ घेण्यात आले. म्हणजेच या मुलांच्या आहाराचे व्यवस्थापन करताना त्यांच्या बौद्धिक विकासाचीही या दिवसात सांगड घालण्यात आली.
मी,माझे सर्व क्रियाशील सहकारी, पालक, शाळा व्यवस्थापन समिती यांच्या अथक परिश्रमातून शाळेला आधुनिक तंत्रज्ञानाचे रूप दिले. उदा. डिजिटल रूम, सीसीटीव्ही, वायफाय इंटरनेट सुविधा, किड्स बँक, नावीन्यपूर्ण विज्ञान केंद्र यातून विद्यार्थ्यांचा विकास होत आहे.- यु. जी. कदम, मुख्याध्यापक