३० जून रोजी अर्धापूर शहरातील नांदेड रस्त्यावर असलेल्या एका व्यायामशाळेत दोन युवकांमध्ये बेबनाव झाला. त्या व्यायामशाळेत एका गटाचे युवक जास्त होते. दुसरा मात्र एकटाच होता. तेव्हा जास्त गटाच्या लोकांनी त्या एकट्यास मारहाण केली. त्यानंतर तो युवक घरी गेला आणि आपल्या काही मित्रांना घेऊन परत व्यायामशाळेकडे येत असताना त्याला मारहाण करणारी मंडळी अर्धापूर शहरातील मारोती मंदिराजवळ भेटली. त्यानंतर भांडणाला सुरुवात झाली. पोलिसांच्या आवाहनाला कोणताही प्रतिसाद न देत दोन्ही गटांनी दगडफेक सुरूच ठेवली. सायंकाळ झाल्यानंतर विद्युत दिव्ये बंद करून गोंधळ सुरूच ठेवला. या ठिकाणी पोलिसांना एक गोळी झाडावी लागली. एक रबर गोळी झाडण्यात आली आणि एकदा अश्रुधुराची नळकांडी फोडावी लागली. त्यानंतर दंगल शमली.
या गुन्ह्याचा तपास अर्धापूरचे पोलीस निरीक्षक अशोक जाधव यांच्याकडे आहे. दंगल घडल्यानंतर पोलीस उपमहानिरीक्षक निसार तांबोळी, पोलीस अधीक्षक प्रमोद शेवाळे यांनी अर्धापूर येथे भेट दिली. पोलिसांनी या प्रकरणी जॉनी हुसेन कुरेशी (वय ३३), मुद्दसर खान सिकंदरखान (३०, रा. बडीदर्गाजवळ अर्धापूर), राम बालाजी गिरी (१९), साईनाथ निरंजन काकडे (२०, रा. कृष्णानगर अर्धापूर), हनुमान हरी बारसे (१९), अशोक भाऊराव कानोडे (३४, रा.अहिल्यादेवीनगर अर्धापूर), शंकर धर्माजी करंडे (२७, रा. अमृतनगर अर्धापूर), शिवप्रकाश उत्तमराव दाळपुसे (२९, रा. अंबाजीनगर अर्धापूर) या सर्वांना पकडले. आज २ जुलै रोजी अशोक जाधव आणि त्यांच्या सहकारी पोलीस अंमलदारांनी अर्धापूरमध्ये राडा करणाऱ्या या ८ जणांना न्यायालयात हजर करून या प्रकरणाच्या तपासासाठी पोलीस कोठडी कशी आवश्यक आहे याबाबत सविस्तर मांडणी न्यायालयासमक्ष केली. युक्तिवाद ऐकून न्यायाधीश मंगेश बिरहारी यांनी या पकडलेल्या आठ दंगलखोरांना ८ दिवस म्हणजे १० जुलैपर्यंत पोलीस कोठडीत पाठविले आहे.