किनवट (जि. नांदेड) : आदिलाबाद ते नांदेड या इंटरसिटी एक्स्प्रेस गाडीचा पुन्हा विलंबाने धावण्याचा कित्ता सुरू झाला आहे. तिरूपती ते आदिलाबाद ही कृष्णा एक्स्प्रेस विलंबाने येत असल्याने पर्यायाने इंटरसिटी आदिलाबाद ते मुदखेडपर्यंत सोडण्यात येत आहे. रविवारी तर इंटरसिटी किनवट येथे ११ वाजता आल्याने नांदेडला जाणाऱ्या प्रवाशांनी पटना - पूर्णा या साप्ताहिक गाडीने जाणे पसंत केले. जर पटना - पूर्णा एक्स्प्रेस नसती तर मात्र मुदखेडपर्यंत जाऊन तिथून अन्य दुसऱ्या गाडीने नांदेडला जाण्याची वेळ आली असती.
तिरूपती ते आदिलाबाद कृष्णा एक्स्प्रेसवर आदिलाबाद ते नांदेड ही इंटरसिटी एक्स्प्रेस अवलंबून आहे. ती जर रद्द झाली किंवा जास्त विलंबाने आली तर नांदेडला जाणारी इंटरसिटी रद्द करण्यात येते. ही डोकेदुखी प्रवाशांसाठी एक दिवसाची नसून अलीकडच्या काळात नित्याची झाली आहे. गेल्या दोन दिवसांपासून तर आदिलाबाद ते नांदेड ही इंटरसिटी नांदेडऐवजी मुदखेडपर्यंत सोडण्यात येत आहे. त्यामुळे प्रवासी त्रस्त झाले आहेत. त्यामुळे इंटरसिटीची ही विलंबाने धावण्याची डोकेदुखी कधी दूर होणार? असा प्रश्न प्रवासी विचारत आहेत.
मुदखेडपर्यंत धावण्याचे कारण काय तर म्हणे इंटरसिटी आदिलाबादवरून विलंबाने सुटत असल्याने वेळेचे गणित जमत नाही. मुदखेडपर्यंत सोडली जात असल्याचे सांगण्यात येत आहे. रविवारी किनवटहून नांदेडला जाणाऱ्या प्रवाशांनी ११ वाजता जाणाऱ्या इंटरसिटीने न जाता दुपारी १२ वाजता जाणाऱ्या पटना गाडीने जाणे पसंत केले, हे विशेष. या मार्गाला कोणीही वाली नसल्याचे प्रवासी बोलू लागले आहेत. इंटरसिटी ही कृष्णा एक्स्प्रेसवर अवलंबून न ठेवता रेल्वे प्रशासनाने स्वतंत्र १७ डब्यांची स्पेशल इंटरसिटी गाडी सोडावी, अशी मागणी आदिलाबादसह किनवट, बोधडी, इस्लापूर व हिमायतनगर येथून ये-जा करणाऱ्या प्रवाशांकडून होत आहे.