जिल्हा परिषदेत विस्तार अधिकारी (पंचायत) यांची एकूण ४० पदे मंजूर असून, तत्कालीन काळात मंजूर पदांपेक्षा अधिक पदे भरण्यात आली असल्याने आणि संवर्गाची बिंदू नामावली अद्ययावत नसल्याने समायोजन प्रक्रिया मार्गी लागण्यास मुख्य अडसर निर्माण झाला होता. मागील सहा महिन्यांत समायोजन प्रक्रिया समुपदेशनद्वारे करण्यासाठी तीनवेळा आयोजन करण्यात आले; परंतु या ना त्या कारणाने ते शक्य झालेले नाही.
दरम्यान, हा तांत्रिक अडसर दूर होण्यासाठी लागणारा विलंब आणि संबंधित विस्तार अधिकारी यांची वेतनाअभावी होत असलेली आर्थिक कोंडी या बाबींचे गांभीर्य लक्षात घेऊन रिक्त जागांवर तात्पुरती पदस्थापना देऊन प्राधान्याने वेतनमानाचा प्रश्न निकाली काढण्याचा निर्णय जिल्हा परिषद प्रशासनाने घेतला असून, यासाठी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. शरद कुलकर्णी यांच्या अध्यक्षतेखाली त्रिसदस्यीय समिती नियुक्त करण्यात आल्याचे वृत्त आहे. उपमुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुधीर ठोंबरे व व्ही. आर. पाटील यांचा या समितीमध्ये समावेश आहे.
याप्रकरणी विस्तार अधिकारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष प्रदीप सोनटक्के यांच्या नेतृत्वाखाली एका शिष्टमंडळाने ५ मे रोजी मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर यांची भेट घेऊन विस्तार अधिकाऱ्यांच्या समायोजनाची मागणी केली. त्यावेळी येत्या आठ दिवसांत प्रलंबित समायोजन प्रक्रिया मार्गी लावून वेतनाचा प्रश्न निकाली काढण्याचे आश्वासन मुख्य कार्यकारी अधिकारी ठाकूर यांनी दिले.
शिष्टमंडळाने मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्यासह अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी सुधीर ठोंबरे, व्ही. आर. पाटील यांना भेटून समायोजन प्रक्रियेमधील उणिवा दूर करू संबंधित विस्तार अधिकाऱ्यांना पदस्थापना देऊन समस्या तात्काळ मार्गी लावण्याची आग्रही मागणी केली. यावेळी संघटनेचे सरचिटणीस जीवन कांबळे, संघटक व्ही. बी. कांबळे, रणजित लोखंडे, धनाजी धर्मेकर, दिलीप बच्चेवार, मुरादे, मुंडकर, देविदास जोगपेठे आदी उपस्थित होते.
आठ दिवसांत समायोजन मार्गी न लागल्यास संघटनेच्यावतीने तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही दिला आहे.