बारड (जि. नांदेड) : संपूर्ण जगाचे लक्ष कोरोनावरील लसीकडे लागले आहे. पुण्याच्या सिरम इन्स्टिट्यूटच्या कोविड शिल्ड लसीच्या चाचणीला प्रारंभ झाला असून, यात नांदेड जिल्ह्यातील बारड येथील रुपेश बाळासाहेब देशमुख याचाही समावेश आहे. त्यामुळे या चाचणीकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. देशमुख यांच्यावर गुरुवारी ही चाचणी करण्यात आली. या तपासणीसाठी २८ दिवसांचा कालावधी लागणार आहे.
कोरोना संसर्गावर लस शोधण्यासाठी जगभरात प्रयत्न सुरू आहेत. परदेशात सिरम इन्स्टिट्यूटच्या कोवीड शिल्ड लसची मानवी चाचणी यशस्वी झाली. भारतात पुण्यामध्ये सिरम इन्स्टिट्यूटमध्ये या लसीच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या मानवी चाचणीचा टप्पा सुरू झाला. बुधवारी पुण्यात भारती विद्यापीठाच्या रुग्णालयात दोन स्वयंसेवकांना अर्धा मि. ली. लसचा डोस देऊन चाचणी करण्यात आली. या चाचणीसाठी निवडण्यात आलेल्या दोन स्वयंसेवकात बारड येथील रुपेश देशमुख यांचा समावेश होता.
या लसीच्या मानवी चाचणीसाठी चार निरोगी स्वयंसेवकांची नाव नोंदणी करण्यात आली होती. त्यात २ पुरुष आणि २ महिलांचा महिलांचा समावेश होता. या सर्व स्वयंसेवकांची खबरदारी म्हणून कोविड चाचणी तसेच अॅन्टीबॉडी तपासणी करण्यात आली होती. निगेटिव्ह अहवाल प्राप्त झाल्यानंतर पात्र ठरलेल्या दोन स्वयंसेवकांना कोरोना प्रतिबंधक लसचा डोस देण्यात आला. भारतात मानवी चाचणीच्या पहिल्या डोसानंतर त्याचे कोणते साईड इफेक्ट होतात, याची तपासणी आता २८ दिवस केली जाणार आहे. २८ दिवसानंतर या लसीचा दुसरा डोस देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.