- शिवराज बिचेवार
नांदेड : माहूरच्या दत्त शिखर परिसरातील भोंदूबाबा कपिलेमहाराज यांच्यासह अन्य तिघांच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. भोंदूच्या अंगावर पाचशेच्या नोटा चिकटवून पूजा करावी लागत होती. भक्तांकडून बाबाने कार, मोबाईल, फ्रीज यासारख्या महागड्या वस्तूही घेतल्या होत्या. लग्न झालेले असताना स्वतःला हा भोंदू मात्र ब्रह्मचारी असल्याचे सांगत होता.
डोंबिवलीच्या प्रवीण शेरेकर यांनी बाबाच्या कृत्याचा भांडाफोड केला आहे. अंधश्रद्धा निर्मूलन समितीनेही या प्रकरणात महत्त्वाची भूमिका बजावली. शेरेकर यांना स्टील डिसिस हा आजार होता. त्यासाठी मुंबईच्या नामांकित रुग्णालयात उपचार घेतले होते. परंतु फरक पडला नव्हता. नंतर ते भोंदू कपिलेच्या संपर्कात आले होते. कपिले महाराजने त्यांचा आजार बरा करतो म्हणून पैसे उकळले. शेरेकर हे अनेक दिवस माहूरला भोंदूच्या मठावर थांबले होते. ते आणि इतर भक्त या ठिकाणी झाडलोट, घोड्यांची निगा राखणे अशी कामे करीत होते. त्यासाठी शेरेकर यांनी नोकरीचा राजीनामाही दिला होता. बाबांच्या सांगण्यावरून ते उत्तराखंड येथील बद्रीनाथपर्यंत पदयात्रा काढण्यास तयार झाले होते. त्यानंतर कपिले महाराज, शेरेकर आणि इतर काही जण माहूरवरून जवळपास पावणे दोन हजार किमी अंतर असलेल्या बद्रीनाथ येथे पायी गेले होते. भोंदू त्याच ठिकाणी थांबला अन् इतरांना परत पाठवले. शेरेकर हे डोंबिवलीला परत आले. थोड्याच दिवसात बाबाने आपली साधना पूर्ण झाली असून गाडी घेऊन न्यायला या. त्यानंतर एक लाख रुपये खर्च करून कारने भोंदूला परत आणण्यात आले होते.
गुप्तधनासाठी खोदले खड्डेभोंदू कपिले महाराजकडे अनेक लोक येत होते. भोंदू त्यांना गुप्तधन शोधून देतो असे सांगत होता. तसेच माहूर परिसरात धनाच्या शोधासाठी अनेक ठिकाणी खड्डेही करण्यात आले आहेत. त्यासाठी मांडूळ आणि कासवाचा वापर करण्यात येत होता.
अघोरी ! भोंदूबाबाने दत्ताचा अवतार सांगत केला रक्ताभिषेक,अनेकांना लाखोंना गंडविले