नांदेड : शासनाने राज्यातील १८० तालुक्यांत आणि त्या तालुक्यांतील काही मंडळांमध्ये पडलेल्या पावसाच्या आकडेवारीवरून दुष्काळसदृश्य परिस्थिती जाहीर केली आहे़ त्यामुळे नांदेड जिल्ह्यातील दुष्काळसदृश्य म्हणून घोषित देगलूर, मुखेड, उमरी या तीन तालुक्यांतील विद्यार्थ्यांना मोफत पासचा लाभ मिळणार असून इतर १३ तालुक्यांतील हजारो विद्यार्थी या योजनेचा लाभ घेवू शकणार नाहीत़़राज्य शासनाच्या वतीने दुष्काळी भागासाठी विविध उपाययोजना, टंचाई निवारणासाठी योजना, चारा छावणी यासह विद्यार्थ्यांसाठी विविध योजना राबविण्याचे नियोजन करीत आहे़ दरम्यान, दुष्काळसदृश्य म्हणून घोषित केलेल्या राज्यातील १८० तालुक्यांमधील तांत्रिक, व्यावसायिक शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना उच्च माध्यमिक व महाविद्यालयात जाणे - येणे करता यावे म्हणून मासिक सवलत पास एसटी महामंडळाकडून देण्यात येते़ परंतु, दुष्काळामुळे पूर्णत: मोफत पास मिळणार आहे़सद्य:स्थितीत राज्य परिवहन महामंडळाकडून शैक्षणिक, तांत्रिक व व्यावसायिक शिक्षण घेणाºया विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी मासिक पासमध्ये ६६.६७ टक्के सवलत दिली जाते. विद्यार्थ्यांना ३३.३३ टक्के रक्कम भरून विद्यार्थी सवलत योजनेचा लाभ दिला जातो़ परंतु, दुष्काळसदृश्य परिस्थितीमुळे या नवीन निर्णयानुसार २०१८-१९ या शैक्षणिक सत्राकरिता नोव्हेंबर ते एप्रिल महिन्यापर्यंत महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना पाससाठी कोणत्या प्रकारचे शुल्क आकारले जाणार नाही़ ही सवलत १५ नोव्हेंबर ते १५ एप्रिलपर्यंत लागू राहणार आहे. या योजनेचा लाभ १८० तालुक्यांतील विद्यार्थ्यांना मिळणार आहे़ यामध्ये नांदेड जिल्ह्यातील देगलूर, मुखेड, उमरी या तीन तालुक्यांचा समावेश आहे़ सदर सवलत केवळ पास नूतनीकरण करणाºया विद्यार्थ्यांकरिता अनुज्ञेय राहणार आहे. नव्याने घेण्यात येणा-या पासेसकरिता ही सवलत लागू राहणार नाही़शहर बससेवेसाठी ही सवलत लागू नाही. या योजनेकरिता नवीन पासेस तातडीने छापून घेण्याच्या सूचना सर्व विभागीय कार्यालयांना वरिष्ठ कार्यालयाने दिल्या आहेत़ दरम्यान, शासनाकडून दुष्काळी भागात राबविण्यात येणा-या विविध उपाययोजना, सवलती आदींचा लाभ प्रत्येकापर्यंत पोहोचला पाहिजे़ या दृष्टीने नियोजन सुरू आहे़ त्याकरिता एसटी महामंडळाच्या सर्व विभागीय कार्यालयांकडून उपलब्ध पासचा साठा, लाभार्थी विद्यार्थ्यांची संख्या आदींची माहिती संकलित केली जात आहे. एस. टी. महामंडळाने याबाबत राज्यातील सर्व आगारप्रमुखांना ५ नोव्हेंबर रोजी एका परिपत्रकाद्वारे कळविले आहे.१३ तालुक्यांतील हजारो विद्यार्थ्यांवर अन्याय
- नांदेड जिल्ह्यातील जवळपास सर्वच तालुक्यांत दुष्काळीस्थिती असून केवळ तीनच तालुक्यांतील विद्यार्थ्यांना मोफत पास देणे म्हणजे इतर भागातील विद्यार्थ्यांची थट्टा उडविणे होय़ कंधार, लोहा, नायगाव यासह इतर तालुक्यांत पाणीटंचाईसह इतर समस्यांना सामोरे जावे लागत आहे़ या भागातही दुष्काळी स्थिती आहे़ त्यामुळे सरसकट नांदेड जिल्हा दुष्काळी जाहीर करून सर्व विद्यार्थ्यांना मोफत पासचा तर शेतक-यांना दुष्काळी योजनांचा लाभ द्यावा, अशी मागणी स्वाभिमानी संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष मारूती देशमुख नरंगलकर यांनी केली आहे़
- नांदेड विभागीय कार्यालयाशी संपर्क साधला असता केवळ देगलूर, मुखेड, उमरी या तीन तालुक्यांचा समावेश असल्याचे सांगण्यात आले़ तसेच संबंधित आगार व्यवस्थापकांना या निर्णयाच्या अंमलबजावणीचे नियोजन करण्याच्या सूचना विभागीय कार्यालयाकडून देण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले़ त्यानुसार माहिती संकलनाचे काम सुरू आहे़