नांदेड : भोकर मतदारसंघाचा इतिहास पाहिला तर १९७५ मध्ये शंकरराव चव्हाण यांच्याविरोधात बाबासाहेब गोरठेकर उभे टाकले होते. त्या निवडणुकीत शंकरराव चव्हाणांना सामान्य जनतेने साथ देत विजयी केले होते. ४४ वर्षानंतर या मतदारसंघात पुन्हा इतिहास घडवायचा आहे, असे प्रतिपादन माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांनी केले.
भोकर मतदारसंघात काँग्रेसचे उमेदवार अशोकराव चव्हाण यांच्या प्रचारार्थ मंगळवारी नागापूर, पोमनाळा, कामणगाव, हाडोळी, निवघा, माळकौठा आदी भागांत प्रचारसभा झाल्या. यावेळी सुभाष किन्हाळकर, बाळासाहेब रावणगावकर, सुभाष कोळेगावकर, राजू दिवसीकर, सुरेश बिल्लेवार, उद्धव केसराळे, आनंद पाटील आदींची उपस्थिती प्रमुख होती. माजी मुख्यमंत्री चव्हाण म्हणाले, भाजप सरकार रस्त्यावरील खड्डे बुजवू शकत नाही, ते सरकार काय चालवू शकेल? कर्जमाफी नाही, पीकविमा नाही, बेरोजगारांना काम नाही. अशा अवस्थेत हे सरकार चालत आहे. भाजपने जिल्ह्याचा काय विकास केला हे विरोधी पक्षाने सांगावे, असेही ते म्हणाले. भोकर मतदारसंघातील पाणीप्रश्न सोडविण्यासाठी आपण प्रयत्न करणार आहोत.
भोकरमध्ये पूर्वी २० हजार लोकांसाठी टँकरने पाणी पुरवले जात होते. मात्र, आपण मुख्यमंत्री झाल्यानंतर प्रत्येक घरात नळाला पाणी आले. भोकरचा विकास कधीही थांबू देणार नाही, असेही चव्हाण यांनी यावेळी सांगितले. या सभांमध्ये दत्तराव मोळके, बालाजी सानपवार आदींनी भाजपा सरकारवर टीका केली. मोदींच्या नोटबंदी निर्णयामुळे सामान्य जनता कोलमडली. अनेक लघुउद्योग बंद पडले. जनधनमध्ये १५ लाखांचे आमिष केंद्र सरकारने दाखविले तर राज्यात फडणवीस सरकारने सातबारा कोरा करण्याची फसवी घोषणा केली. या फसव्या सरकारला आता पुन्हा सत्तेवार आणण्याची चूक करु नका, असे आवाहनही यावेळी करण्यात आले. या सभेला अॅड. शिवाजीराव कदम, उज्ज्वला देसाई, गंगाधर पाटील, गणपत जोंधळे, केशव गोडबोले, प्रकाश बच्चेवार, दत्तात्रय सोळंके, सुभाष पिठ्ठेवाड, गजानन गोडबोले, माधव पोमनाळकर, साईनाथ सोळंके, गंगाराम सोळंके आदींची उपस्थिती होती.
गोल्लेवार समाजाचे प्रश्न सोडविण्यासाठी पुढाकारच्चव्हाण यांच्या उपस्थितीत भोकर येथे गोल्ला-गोल्लेवार समाजाचा मेळावा घेण्यात आला. गोल्ला-गोल्लेवार समाजाचे प्रश्न सोडविण्यासाठी आतापर्यंत आपणच पुढाकार घेतला आहे. आपण श्रीकृष्णाचे भक्त असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. भाजपने गोल्ला-गोल्लेवार समाजाचे मते खराब करण्यासाठी गोल्ला-गोल्लेवार समाजाचा उमेदवार दिला आहे. हा उमेदवार यापूर्वी भाजपामध्ये होता. हे सर्वजण जाणतात. ज्याप्रमाणे लोकसभा निवडणुकीत वंचितने १ लाख ६७ हजार मते वाया घातली. त्यासारखाच प्रयोग भोकरमध्ये होत असून तो प्रयोग हाणून पाडण्याचे आवाहन त्यांनी केले. यावेळी आ. अंजली निंबाळकर, मारोतराव बल्लाळकर, प्रा. गणेश अटकमवार, संजू आऊलवार, आनंदराव गादिलवार, मारोतराव संपलवार, राम भटकमवार, रामेश्वर जागेमवार आदींची उपस्थिती होती.