लोकमत न्यूज नेटवर्ककिनवट : गोकुंदा येथील शांतिनिकेतन इंग्लिश शाळेच्या मुख्याध्यापिका सुरेखा राठोड यांच्या हत्येप्रकरणातील दुसऱ्या क्रमांकाच्या संशयित आरोपी वैशाली माने हिला व तिच्या पतीला तब्बल पंचवीस दिवसांनी तेलंगणातील पोकंपल्ली (जि. संगारेड्डी, तेलंगणा) यांना १६ सप्टेंबरच्या रात्री अटक करण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश मिळाले. न्यायालयाने वैशालीला ५, तर पती प्रा. शेषराव मानेला २ दिवस पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश किनवट न्यायालयाने दिला.२३ आॅगस्ट रोजी गोकुंदा येथील शांतीनिकेतन इंग्रजी शाळेच्या मुख्याध्यापिका सुरेखा राठोड यांचा त्यांच्या शिवनगरीतील राहत्या घरी निर्घृणपणे खून करण्यात आला होता. पोलिसांनी सुरेखा यांचा पती विजय अटक केली. याप्रकरणी सुरेखा यांचा भाऊ विलास जाधव यांच्या फिर्यादीवरुन पोलिसांनी विजय राठोड, त्याची मैत्रीण वैशाली माने, अशोक टोपा राठोड, प्रमोद उर्फ अजय थोरात यांच्याविरूद्ध गुन्हा दाखल केला होता. विजय यापूर्वीच दोन वेळेस पोलीस कोठडीत होता. घटनेनंतर वैशाली फरार झाली होती. तिच्या अटकेसाठी किनवट, गोकुंदा बंदही ठेवण्यात आल्याने पोलिसांनी जंगजंग पछाडले होते. परंतु ते पोलिसांच्या हाती लागले नव्हते़ दरम्यान, गोरसेनेने पुन्हा १८ सप्टेंबर रोजी नांदेड जिल्हा बंदची हाक दिली होती.स्थानिक गुन्हे शाखेने १६ सप्टेंबर रोजी वैशालीला अटक केली.जिल्हा पोलीस अधीक्षक संजय जाधव, अतिरिक्त पोलीस अधीक्षक डॉ़अक्षय शिंदे, किनवटचे उपविभागीय पोलीस अधिकारी सदाशिव चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थागुशाचे पोनि सुनील निकाळजे, प्रशिक्षणार्थी पोलीस उपअधीक्षक शेंडगे, पोउपनि कल्याण नेहरकर, सदानंद वाघमारे, भीमराव राठोड, दत्ता वाणी, अफजल पठाण, देवा चव्हाण, महिला कर्मचारी देवणे, श्रीमंगले, संगीता पोहरे यांनी सापळा रचून वैशाली व तिच्या पतीने अटक केली़
- सोमवारी वैशाली व तिच्या पतीला न्या. जहागीर पठाण यांच्या न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने दोघांनाही पोलीस कोठडी सुनावली. न्यायालय परिसरात बघ्यांनी मोठी गर्दी केली होती. दोघांच्या अटकेनंतर सुरेखा यांच्या खुनाचे रहस्य उलगडण्याची शक्यता आहे. तब्बल पंचवीस दिवसानंतर वैशाली माने ही पोलिसांच्या हाती लागली़ दिवसेंदिवस या प्रकरणाचा गुंता वाढतच चालला आहे़