चित्रा वाघ यांनी सध्या राज्यात सुरू असलेल्या महिला अत्याचार व प्रशासनातील महिलांवर होणाऱ्या अन्यायाचा पाढाच वाचला. सरकार कोणाचेही असो, परंतु विकृती ठेचून काढण्याचे काम सरकारने केले पाहिजे. मात्र, आजघडीला राज्यात कायदा व सुव्यवस्था राहिली नसून प्रत्येक तालुक्यात, गावात महिलांवरील अत्याचाराचे प्रमाण वाढले आहे. महिला आयोगाचे अध्यक्षपद दीड वर्षापासून रिक्त असून ते भरण्यासाठी महिला व बालकल्याण मंत्र्यांकडून आठ वेळा प्रस्ताव जाऊनही मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री याकडे दुर्लक्ष करीत असतील तर न्याय कोणाकडे मागायचा, असा सवाल चित्रा वाघ यांनी उपस्थित केला.
एसटी महामंडळातील कर्मचाऱ्यांना योग्यवेळी पगार मिळत नसल्याने त्यांच्यावर आत्महत्येची वेळ येतेय. राज्यात तीन एसटी कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केल्या, त्यास कारणीभूत असणाऱ्या परिवहन मंत्र्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणीही वाघ यांनी केली.
चौकट
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली देशात स्वास्थ्य स्वयंसेवक अभियान राबविण्यात येत आहे. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत प्रत्येकापर्यंत हेल्थ व्हॅलेंटिअर पोहोचले पाहिजे, असे नियोजन भाजपच्या वैद्यकीय आघाडीकडून केले जात आहे. राज्यात चार लाख गावात आठ लाख व्हॅलेंटियर नियुक्त केले जाणार आहेत. राज्यात ४५ हजार गावात हे अभियान राबविण्यात येणार असून ४२ जिल्ह्यात त्याची सुरूवात झाल्याचे वाघ यांनी सांगितले. नांदेड जिल्ह्यातील व्हॅलेंटिअरला प्रशिक्षण देण्याचे काम सुरू आहे.