नांदेड: नांदेडमध्ये कोरोना पॉझिटीव्ह आढळून आल्यानंतर पालकमंत्री अशोक चव्हाण मुंबईला उपचारासाठी गेले होते. आठ दिवसाच्या उपचारानंतर त्यांनी कोरोनावर यशस्वीपणे मातही केली. त्यानंतर आज बुधवारी प्रथमच ते जिल्हाप्रशानासोबत व्हिडीओ कॉन्फरन्सींगद्वारे आढावा बैठक घेणार आहेत.
२५ मे रोजी पॉजिटीव्ह आढळल्यानंतर अशोक चव्हाण यांना २६ मे रोजी तातडीने मुंबईला हलविण्यात आले होते. तेथे उपचारानंतर ४ जुन रोजी ते कोरोनामुक्त झाले. त्यानंतर काही दिवस काही दिवस मुंबईतच घरी आराम करण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला होता. त्यानंतर आज प्रथमच ते आढावा बैठक घेत आहेत.
आज बुधवारी दुपारी ३ वाजता जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांच्यासह प्रमुख अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत ही ऑनलाईन बैठक होणार असून, कोरोनाची जिल्हयातील स्थिती, प्रशासनाकडून यासंबंधी करण्यात येत असलेल्या उपाययोजनासह खरीप पेरणीच्या अनुषंगाने कृषी विभागाच्या तयारीची माहिती घेणार आहेत. यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना कर्जमाफी, कर्जवाटपासह इतर माहिती देण्यास सांगितले आहे. शैक्षणिक संस्था जुलै महिन्यापासून सुरू करण्याचे निर्देश शासनाने दिले आहेत. या अनुषंगानेही पालकमंत्री आढावा घेणार असल्याचे त्यांच्या कार्यालयाने सांगितले.