शिक्षणानंतर रोजगार नाही, मजुरी करावी लागते; राहुल गांधींकडे बेरोजगारांनी मांडल्या व्यथा
By ऑनलाइन लोकमत | Published: November 9, 2022 06:15 PM2022-11-09T18:15:33+5:302022-11-09T18:16:11+5:30
केंद्र शासन देशातील शिक्षण आणि आरोग्य क्षेत्राचे खासगीकरण करीत आहेत. त्यामुळे समस्या कमी होण्या ऐवजी वाढल्या आहेत.
- शब्बीर शेख/रत्नाकर जाधव
देगलूर/बिलोली : या देशात शिक्षण होऊ शकते; परंतू रोजगार मिळू शकत नाही. मजुरीच करावी लागते. अशा समस्या विद्यार्थ्यांनी आपल्यासमोर मांडल्या. देशातील हे वास्तव बदलण्याची गरज आहे आणि त्यासाठीच ही पदयात्रा आपल्यापर्यंत पोहोचली, असे खासदार राहुल गांधी यांनी नागरिकांशी संवाद साधताना सांगितले.
मंगळवारी भारत जोडो पदयात्रा बिलोली तालुक्यातील भोपाळा येथे पोहोचली. या ठिकाणी राहुल गांधी यांनी नागरिकांशी संवाद साधला. या सभेला महाराष्ट्र प्रभारी एच.के. पाटील, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण, सुशीलकुमार शिंदे, बाळासाहेब थोरात, माणिकराव ठाकरे, खासदार रजनी पाटील, नसीम खान, डी.पी. सावंत, विश्वजीत कदम आदींची उपस्थिती होती. राहुल गांधी म्हणाले, काही वर्षांपूर्वी मोदी सरकारने देशात नोट बंदी लागू केली. परदेशातील काळे धन आणण्याचे सांगत ही नोट बंदी लागू केली. काळे धन आणण्यासाठी नोटबंदी नव्हती तर शेतकरी आणि व्यापाऱ्यांवर ती आफत होती. नोट बंदीने देशातील रोजगार देणाऱ्या सर्वांना नष्ट केले. जीएसटी आणि नोट बंदी, दुसरीकडे खासगीकरणामुळे सर्व समस्या वाढल्या आहेत, असे राहुल गांधी म्हणाले. नरेंद्र मोदींनी छोटे व्यापारी संपविले, असा आरोप राहुल गांधी यांनी केला.
पद यात्रेत मिळालेला प्रतिसाद पाहुन राहुल गांधींनी नागरिकांचे आभारही मानले. ते म्हणाले, यात्रा सुरु होऊन ६० दिवस पूर्ण झाले आहेत. पण लोकांचा उत्साह पाहून आताच यात्रा सुरु झाली असे वाटते. दररोज २५ कि.मी. चालत आहे. परंतू थकवा येत नाही. कारण ही जनसामान्यांची शक्ती आहे आणि ही शक्तीच आपल्या यात्रेला बळ देत आहे. त्यामुळे ही यात्रा आता थांबणार नाही. श्रीनगरपर्यंत नेणारच, असा आत्मविश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला. या सभेमध्ये राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर टिका केली.
काश्मिरमध्ये तिरंगा फडकविणार
भारत जोडो यात्रेच्या माध्यमातून देशभरातील नागरिकांमध्ये एकता आणि बंधुत्वता निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. अखंड भारतासाठी कन्याकुमारी येथून ही पद यात्रा सुरु झाली असून काश्मिरची राजधानी श्रीनगर येथे या यात्रेच्या माध्यमातून तिरंगा फडकविणार, असा आत्मविश्वास त्यांनी व्यक्त केला.
खासगीकरण हेच समस्यांचे मूळ
केंद्र शासन देशातील शिक्षण आणि आरोग्य क्षेत्राचे खासगीकरण करीत आहेत. त्यामुळे समस्या कमी होण्या ऐवजी वाढल्या आहेत. काही मोजक्या लोकांच्या हाता अर्थकारण जात आहे. त्यामुळे गरीब गरीबच राहत असून मोजकेच श्रीमंत होत आहेत.
देशात भीतीचे वातावरण
सध्या भीतीचे वातावरण निर्माण केले जात आहे. या भितीमधूनच द्वेष निर्माण केला जातो. भीती नसती तर द्वेष निर्माण झाला नसता. देशात पसरविला जाणारा हा द्वेष आणि द्वेष भावना घालविण्यासाठीच आम्ही ही पदयात्रा सुरु केली आहे, असे राहुल गांधी यांनी स्पष्ट केले.