हदगाव (जि. नांदेड) : गारगव्हाण येथील जिल्हा परिषद शाळेच्या शिक्षक व स्वयंपाकी महिलेच्या निष्काळजीपणामुळे खिचडीत साप शिजला़ त्यामुळे ८० विद्यार्थी बालंबाल वाचले, परंतु पालकांनी त्या बाईला कामावरून कमी केल्याशिवाय शाळेत पाल्यांना न पाठविण्याचा निर्णय घेतल्यामुळे गुरुवारी शाळा उघडूनही विद्यार्थ्याविना बंदच राहिली़
३० जानेवारी रोजी दुपारी मध्यान्ह भोजनासाठी दिली जाणारी खिचडी शिजविताना उघड्या पात्रामध्ये किचनशेडच्या पत्रावरील साप पडून तो शिजला व तो साप विद्यार्थ्याच्या ताटामध्ये आल्याने एकच खळबळ उडाली़ परंतु विद्यार्थ्यांनी त्या महिलेला माहिती दिल्यामुळे पुढील अनर्थ टळला़ पालक चौकशीला गेल्याने शिक्षक, मुख्याध्यापक व स्वयंपाकी बाईने उलटसुलट उत्तरे दिल्याने पालक आक्रमक झाले होते़ मनाठा पोलिसांनी घटनास्थळी येवून त्यांची समजूत काढली व शिजवलेली खिचडीचे नमुने सीआयडीकडे पाठविले़ खिचडी तपासल्यानंतर त्यामध्ये विष होते की नाही ते कळेल़
३१ जानेवारी रोजी नेहमीप्रमाणे शाळेसाठी शिक्षक आले़ परंतु एकही विद्यार्थी शाळेत आला नाही. केंद्रप्रमुख शेख, विस्तार अधिकारी वैशाली अडगावकर या शाळेवर ठाण मांडून होते़ तरीही पालकांनी ऐकले नाही. गटशिक्षणाधिकारी रुस्तुम ससाणे व डेप्युटी सीईओ कोंडेकर यांनी शाळेला भेट दिली.