किनवट (जि. नांदेड) : पैनगंगा नदीवर पार्टी करण्यासाठी मारेगाव (खा.) येथील एक कुटुंब गेले होते. पार्टी केल्यानंतर पोहत असताना मारेगाव शिवारात नदीच्या पाण्यात बुडून तिघींचा मृत्यू झाला. मृतांमध्ये दोन बहिणींचा समावेश आहे. ही घटना २७ मे रोजी दुपारी दीडच्या सुमारास घडली. पोलिसांनी पंचनामा केल्यानंतर सायंकाळी साडेपाच वाजता घटनास्थळावरून तिन्ही मृतदेह शवविच्छेदनासाठी गोकुंदा उपजिल्हा रुग्णालयात हलवले आहेत.
पोलिस सूत्रांच्या माहितीनुसार, किनवट पोलिस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या मारेगाव (खा.) येथील एक कुटुंब मारेगाव शिवारातील पैनगंगा नदीवर २७ मे रोजी पार्टी करण्यासाठी गेले होते. पार्टी झाल्यानंतर नदीत ममता शेख जावेद (वय २१), पायल देवीदास कांबळे (वय १६) व तिची बहीण स्वाती देवीदास कांबळे (वय १३) व अन्य पोहण्यासाठी गेले होते. नदीत एकमेकांवर पाणी टाकत पोहण्याचा आनंद लुटत असतानाच यातील एक जण बुडू लागली. तिला वाचवण्यासाठी गेलेल्या अन्य दोघीही बुडाल्या. यात तिघींचा बुडून मृत्यू झाला. पोहता येणारी एक महिला सुखरूप निघाली असून एकजण घटनास्थळावरून पळून गेल्याची चर्चा सुरू आहे.
घटनेची माहिती मिळताच पोलिस निरीक्षक सुनील बिर्ला, सपोनि येवले, पोलिस उपनिरीक्षक गणेश घोटके, दत्तात्रय मामीडवार, पोहेकॉ संग्राम मुंडे यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. एकाच कुटुंबातील दोन बहिणी व अन्य एक विवाहित महिला अशा तिघींचा पैनगंगा नदीच्या पाण्यात बुडून मृत्यू झाल्याने एकच खळबळ उडाली आहे.