मंगळवारी सिटूच्या वतीने घरेलू कामगारांच्या प्रमुख मागण्या घेऊन सहायक कामगार आयुक्त कार्यालयात घुसून प्रचंड घोषणाबाजी करत चार तास ठिय्या आंदोलन केले.
आंदोलनात लक्षवेधी घोषणा देत केरळच्या धर्तीवर घरेलू कामगारांना दरमहा किमान सात हजार पाचशे रुपये राज्य सरकारने अनुदान द्यावे, घरेलू व बांधकाम कामगारांची बोगस नोंदणी नांदेड कामगार कार्यालयात मोठ्या प्रमाणात करण्यात आली असून, संबंधित अधिकारी, कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणीदेखील करण्यात आली आहे. केवळ शासनमान्य नोंदणीकृत संघटनेच्या वतीने आलेले अर्ज स्वीकारावेत व दलाल पद्धती बंद करून कार्यालयीन कर्मचाऱ्यांना सौजन्याने वागण्याची समज वरिष्ठांनी द्यावी, सहा वर्षे सेवा करणाऱ्या कर्मचाऱ्यांची बदली करून रिक्त जागा तातडीने भराव्यात. अडचणीत सापडलेल्या कामगारांना मनमानी अटी लादून कार्यालयातील कर्मचारी चकरा मारण्यासाठी भाग पाडत आहेत. त्या कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी.
या प्रमुख मागण्यांसह इतरही मागण्या करण्यात आल्या आहेत.
यावेळी कामगार आयुक्त मोहसन सय्यद यांनी पुढील सात दिवसांत मागण्या सोडविणार असल्याचे लेखी पत्र संघटनेला दिले.
आंदोलनाचे नेतृत्व घरेलू कामगार संघटनेचे अध्यक्ष कॉ. गंगाधर गायकवाड, सरचिटणीस कॉ. उज्ज्वला पडलवार, कार्याध्यक्ष कॉ. करवंदा गायकवाड, सिटू जिल्हा समिती सदस्य कॉ. मारुती केंद्रे, कॉ. सुंदरबाई वाहूळकर, कॉ. लता गायकवाड, कॉ. हनुमंत सांगळे, कॉ. सचिन वाहूृळकर, बालाजी वाघमारे, रमेश थोरात, सरस्वतीबाई थोरात, शिल्पा साबळे, मुतेमवार, बबन वाहूळकर आदींनी केले. सर्व कल्याणकारी योजनांची अंमलबजावणी करण्यास कामगार कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी हयगय केल्यास त्या कर्मचाऱ्यांच्या विरोधात न्यायालयात दाद मागणार व लढा आणखी तीव्र केला जाईल, असा इशारा संघटनेचे अध्यक्ष कॉ. गायकवाड यांनी दिला.