नांदेड- औद्योगिक वसाहत परिसर व सिडको भागात पाणी पुरवठा करणारे पाईप लाईन वाघाळा, आसदवन पाण्याच्या टाकीसमोर फुटल्याने सोमवारी सकाळी ५ वाजल्यापासून लाखो लिटर पाणी वाया गेले. यामुळे रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते. विष्णूपुरी जलशयातून पाणी पुरवठा करणारी पाईपलाईन कुचकामी झाल्याने अनेक दिवसापासून पाईपलाईन दुरूस्तीची मागणी होत आहे. मात्र याकडे लक्ष देण्यात येतआहे.या पाईपलाईनच्या वाॅल्वमधून सतत पाण्याचे लिकेज होत असते. त्यामुळे हजारो लिटर पाण्याची नासाडी होत आहे.
बेल्ट वितरण सोहळा
नांदेड- जिजाऊ सृष्टी सिडको नवीन नांदेड येथे २०डिसेंबररोजी बेल्ट परीक्षा नांदेड जिल्हा मार्शल आर्ट असोिसएशनच्या वतीने घेण्यात आली.यावेळी ४० विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या बेल्टची परीक्षा देवून यश संपादन केले. परिक्षार्थ्यांना प्रशिक्षक एकनाथ पाटील, नफीस शेख, केरबा कंधारे, दिशा चित्तारे, सतिश पटवेकर, प्रतिक्षा थोरात, गोविंद इंगोले यांचे मार्गदर्शन लाभले. यशस्वीतेसाठी नितीन देडे, साईनाथ देशमाने, विशाल गायकवाड, गोविंद सोनकांबळे यांनी परिश्रम घेतले.
दत्तनाम सप्ताह
नांदेड- सोनखेड पासून जवळच असलेल्या मोहनपुरा व वाहेगाव येथील श्री गोदावरी तीर्थक्षेत्र संस्थान येथे दरवर्षी प्रमाणे यंदाही श्री दत्तात्रय जन्मोत्सव निमित्त २३डिसेंबर पासून दत्तनाम सप्ताह होणार आहे. या निमित्ताने दररोज पहाटे काकडा, सकाळी ७ वाजता बालक्रिडा पारायण, दुपारी १ वाजता भागवत कथाकार द. भ. प.पुरूषोत्तम महाराज देशमुख यांचे श्रीमद् भागवत कथा होणार आहे.