नांदेड: पुलवामा दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांच्या आत्म्यांना शांती मिळावी यासाठी नांदेड येथील श्री सचखंड गुरुद्वारात १७ फेब्रुवारी रोजी श्री गुरु ग्रंथसाहिबजी यांचे अखंडपाठ सुरु करण्यात येणार आहेत. या पाठाची समाप्ती १९ फेब्रुवारी रोजी सकाळी साडेआठ वाजता होणार आहे. यावेळी शहिदांसाठी अरदासही केली जाणार आहे.
श्री सचखंड गुरुद्वारात आज काश्मीरमधील पुलवामा येथे शहीद झालेल्या सीआरपीएफ जवानांना श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी संतबाबा कुलवंतसिंघजी, संतबाबा ज्योतिंदर सिंघजी, संतबाबा काश्मीरसिंघजी, संतबाबा अवतारसिंघजी, संतबाबा रामसिंघजी धुपिया आदींची उपस्थिती होती. दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना श्रद्धांजली वाहण्यासाठी गुरुद्वारा बोर्डाचे कार्यालय तसेच बोर्डाच्या सर्व शैक्षणिक संस्था शनिवारी बंद ठेवण्यात आल्या होत्या.
दरम्यान, पुलवामा दहशतवादी हल्ल्याचा गुरुद्वारा बोर्डाचे अध्यक्ष आ. तारासिंघ, सरदार भूपेंद्रसिंघ मिन्हास, स. परमज्योतसिंघजी चाहेल यांच्यासह गुरुद्वारा बोर्डाचे सदस्य, व्यवस्थापन समिती सदस्य आदींनी तीव्र निषेध करताना या हल्ल्याचे चोख प्रत्युत्तर द्यावे, अशी मागणी केली.