नांदेड: बोंढार हवेली येथे १ जून रोजी अक्षय भालेराव या तरुणाचा निर्घृण खून करण्यात आला होता. या प्रकारणात पोलिसांनी सात जणांना अटक केली होती. त्यानंतर आठवा आरोपीही पोलिसांच्या हाती लागला असून त्याला न्यायालयाने ९ जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.
बोंढार हवेली या गावात किराणा दुकानावर उभे असताना अक्षय भालेराव आणि त्याच्या भावाला जातीवाचक शिवीगाळ करून मारहाण करण्यात आली. यावेळी अक्षयचा भोसकून खून करण्यात आला होता. खुनाच्या या घटनेनंतर जिल्ह्यात खळबळ उडाली होती. या प्रकरणात पोलिसांनी नऊ जणांविरुद्ध गुन्हा नोंद केला होता. त्यातील सात जणांना अटक केली होती. या सातही जणांना न्यायालयाने ९ जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली होती. तर दोन आरोपी मात्र फरार होते. त्यातील आठवा आरोपी बालाजी भूजंगराव मुंगल याला रविवारी अटक करण्यात आली आहे. सोमवारी त्याला न्यायालयात हजर करण्यात आले होते. न्या. एस. ई. बांगर यांनी मुंगलला इतर सात आरोपींसोबत ९ जूनपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.