नांदेड: बोंढार हवेली येथील अक्षय भालेराव या युवकाची झालेली हत्या अत्यंत निषेधार्ह आहे. पोलिसांनी दिरंगाई न करता या गंभीर प्रकरणाचा सखोल तपास करून दोषींना कठोर शिक्षा होईल, अशा पद्धतीने आरोपपत्र दाखल करावे. दरम्यान, कोणीही या प्रकरणाला वेगळे वळण देऊन जिल्ह्यातील वातावरण खराब करू नये व शांतता कायम ठेवावी, असे आवाहन माजी मुख्यमंत्री आमदार अशोकराव चव्हाण यांनी केले आहे.
अक्षय भालेराव हत्याप्रकरणी ते म्हणाले की, २ जून रोजी सकाळी या घटनेबाबत माहिती मिळताच संबंधित पोलिस अधिकाऱ्याकडून घटनाक्रम व तपासाच्या प्रगतीची माहिती घेतली. या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता पोलिसांनी तातडीने कारवाई करावी, अशी सूचनाही केली. लोकशाही व संविधानानुसार चालणाऱ्या भारतात | अशा घटना घडणे चुकीचे आहे. त्यामुळे सदर हत्या प्रकरणातील आरोपींना लवकरात लवकर व कठोर शिक्षा होऊन पीडित भालेराव कुटुंबाला न्याय मिळवून देण्याची आवश्यकता असल्याचे अशोकराव चव्हाण पुढे म्हणाले.
नांदेड जिल्ह्यात घडलेली ही घटना राज्य सरकारचे अपयश आहे. या प्रकरणामध्ये कायदा व सुव्यवस्थेची लक्तरे वेशीवर टांगली गेली आहेत. त्यामुळे राज्य सरकारने तातडीने आपली जबाबदारी स्वीकारून हा तपास वेगाने पूर्ण करावा, अशी आमची मागणी आहे.