नांदेड : साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त असलेल्या अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर दरवर्षी होणारे लग्नसोहळे यंदा लॉकडाऊनमुळे पाहण्यास मिळणार नाहीत. सलग दोन वर्षांपासून कोरोनामुळे अक्षय तृतीयेच्या मुहूर्ताला फटका बसत आहे. लॉकडाऊनमुळे प्रशासनाकडून आलेले निर्बंध आणि कोरोनाची भीती यामुळे पुन्हा अक्षय तृतीयेचा मुहूर्त हुकला आहे. दरवर्षी अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर लग्न करण्यासाठी अनेकांची लगबग असायची. मंगल कार्यालय बुक करण्यासाठी मोठी धावपळ होत असे. अनेकवेळा या दिवशीची तारीखही मिळत नव्हती. शहरातील सर्व मंगल कार्यालये, कापड बाजारपेठ, सराफा बाजार हाऊसफुल्ल असायचे. मात्र, यावर्षी या मुहूर्तावर लग्न नसल्याने शुकशुकाट पाहण्यास मिळणार आहे. विशेषत: जानेवारी, फेब्रुवारी महिन्यात अनेकांनी या मुहूर्तावर लग्नाची तारीख बुक केली होती. मात्र, मार्च महिन्यापासूनच कोरोनाची दुसरी लाट आली आणि पाहता-पाहता कोरोना महामारीने सर्वांना कवेत घेतले. कोरोना रूग्णांची संख्या व मृत्यदर वाढल्याने सर्वत्र भयभीत वातावरण पाहण्यास मिळत होते. त्यामुळे अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर लग्न निश्चित करणाऱ्यांनी लग्न रद्द केली आहेत.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाने निर्बंध घातले आहेत. त्यामुळे अनेकांनी लग्नकार्य तसेच अन्य कामांचा मुहूर्त पुढे ढकलले आहेत. लग्न सोहळे कार्यक्रमच रद्द झाल्यामुळे व्यापाऱ्यांना मोठा फटका बसला आहे.
शहरात दरवर्षी अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर सराफा बाजारात माेठी गर्दी असते. तसेच कापड बाजारातही मोठी उलाढाल असायची. मात्र, यंदा कोरोनामुळे सलग दुसऱ्यावर्षी बाजारपेठेत शांतता आहे.
चौकट- मे महिन्यातील मुहूर्त
लग्नसराईत मे महिन्यात सर्वाधिक तारखा असल्याने अनेकांनी या महिन्यातच लग्नाची तारीख निश्चित केली होती. या महिन्यात अक्षय तृतीयेचा मुहूर्त गाठून लग्न निश्चित केले होते.
चौकट- नियमांचा अडसर
शासनाने कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे राज्यभरात कडक निर्बंध लावले आहेत. त्याची अंमलबजावणी सर्व जिल्ह्यांत होत आहे. लॉकडाऊनमुळे बाजारपेठा बंद आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनाने लग्न सोहळ्यांवर निर्बंध लावले आहेत. २५ पेक्षा अधिक माणसे लग्नात असू नयेत, २ तासातच लग्न सोहळे आटोपते घ्यावेत, आदी नियमांचा अडसर ठरत आहे.
यंदाही कर्तव्य नाही
१. कोरोनामुळे मागील वर्षीसुद्धा लग्न सोहळ्यावर विरजण पडले होते. यंदाही हीच परिस्थिती आहे. लॉकडाऊनमुळे रोजगार गेला. या काळात मुलीच्या लग्नासाठी जुळवाजुळव करणे अशक्य झाले. त्यामुळे यावर्षी लग्न न करण्याचे ठरवले आहे. - बाबाराव अवचार, नांदेड.
२. कोरोनाची भीती निर्माण झाल्यामुळे यंदा लग्न न करण्याचा निर्णय घेतला आहे. एक वर्ष लग्न पुढे ढकलले तर काही फरक पडत नाही. लॉकडाऊनमध्ये लग्न लावणे अवघड आहे. शासनाच्या कडक निर्बंधांचे पालन करणे अशक्य आहे. - बबन भालेराव, नांदेड.