उमरी : शहरापासून पाच किलोमीटर अंतरावरील जामगाव जवळ देशी दारूचे बॉक्स घेऊन येणारा टेम्पो उलटल्याने लॉकडाऊनमध्ये अडकलेल्या तळीरामांची चांगलीच चंगळ झाली. नागरिकांनी मदत करायची सोडून अपघातग्रस्त टेम्पोमधून क्षणार्धात ३३ बॉक्स लंपास केले. हि घटना मंगळवारी दुपारी जामगावजवळ घडली.
कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने सर्वत्र लॉकडाऊन आहे. यामुळे दारू दुकाने बंद होती. यानंतर तब्बल दोन महिन्यानंतर दारू दुकाने सुरू करण्यात आली. मात्र येथून दारू घेण्यास अनेक नियम व अटी आहेत. दरम्यान, मंगळवारी ( दि. १९ ) दुपारी एक टेम्पो (एमएच ४३ - ११०२ ) नांदेडहून उमरीकडे देशी दारूचे बॉक्स घेऊन येत होता. उमरीपासून पाच किमी अंतरावर जामगावजवळ चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने टेम्पो उलटला. या अपघातात चालकाला किरकोळ दुखापत झाली. मात्र देशी दारूचा टेम्पो उलटल्याची माहिती मिळताच अवघ्या काही क्षणातच तळीरामांनी एकच गर्दी केली. आयती दारू मिळाल्याने तळीरामांना यावर डल्ला मारला. मदत करण्याऐवजी नागरिकांनी दारुच्या बाटल्या जमा करायला सुरुवात केल्याचे चित्र येथे दिसत होते. टेम्पोत देशी दारूचे ४१४ बॉक्स होते. त्यातील काही बॉक्स फुटले तर जवळपास ३३ दारूचे बॉक्स घटनास्थळावरून लांबविण्यात आले. यानंतर दुकादाराने उरलेले बॉक्स दुसऱ्या गाडीतून उमरीला आणले.