महापालिका सभापतीपदासाठी सर्वच सदस्य इच्छुक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 24, 2019 08:03 PM2019-12-24T20:03:10+5:302019-12-24T20:04:18+5:30
स्थायी समितीच्या पंधराही सदस्याने घेतले नामनिर्देश अर्ज
नांदेड : महापालिकेच्या स्थायी समिती सभापतीपदाची निवडणूक प्रक्रिया २३ डिसेंबरपासून सुरू झाली आहे. सोमवारी नामनिर्देशनपत्र घेण्याच्या मुदतीत स्थायी समितीच्या सर्व सदस्यांनी नामनिर्देशनपत्र घेतले आहेत. त्यामुळे काँग्रेसचे स्थायी समितीवरील सर्वच सदस्य या पदासाठी इच्छुक असल्याचे स्पष्ट झाले आहे.
स्थायी समितीवरील आठ सदस्यांचा कार्यकाळ १ डिसेंबर रोजी संपला आहे. त्यामध्ये स्थायी समितीचे सभापती फारुख अली खान यांचाही समावेश होता. त्यामुळे नव्या सभापती निवडीचा कार्यक्रम विभागीय आयुक्तांनी घोषित केला आहे. रिक्त झालेल्या आठपैकी सात जागेवर काँग्रेसचे सदस्य निवडण्यात आले आहेत.
स्थायी समिती सभापतीपदाची निवडणूक २६ डिसेंबर रोजी होणार आहे. या निवडणुकीसाठी २३ डिसेंबर रोजी नामनिर्देशनपत्र देण्यात आले. नामनिर्देशनपत्र घेण्यासाठी एकच दिवस होता. या कालावधीत काँग्रेसच्या ज्योती किशन कल्याणकर, करुणा कोकाटे, दयानंद वाघमारे, राजेश यन्नम, पूजा पवळे, अ. रशीद अ. गणी, फारुख हुसेन, श्रीनिवास जाधव, अपर्णा नेरलकर, ज्योती रायबोले, नागनाथ गड्डम, बापूराव गजभारे, अमितसिंह तेहरा, दीपाली मोरे आणि शबाना बेगम या स्थायी समितीवरील १५ सदस्यांचा समावेश आहे.
अशोक चव्हाणच ठरविणार सभापती
सभापतीपदासाठी काँग्रेसचे सर्व सदस्य इच्छुक असले तरी या पदासाठी काँग्रेसचे नेते, माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण हे ज्यांचे नाव सुचवतील तोच उमेदवार उमेदवारी दाखल करेल, हे निश्चित आहे. आतापर्यंतचा इतिहास पाहता स्थायी समिती व महापालिकेत काँग्रेसकडून चव्हाण ज्या नावाला पसंती देतात तोच उमेदवार अर्ज भरतो. त्यामुळे स्थायी समिती सभापतीपदासाठी २४ डिसेंबर रोजी अर्ज भरले जाणार आहेत. या पदासाठी चव्हाण हे कुणाला संधी देतात? हे मंगळवारी स्पष्ट होणार आहे.