नांदेड : मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी शब्द दिला होता, त्याप्रमाणे आज हिवाळी अधिवेशनात मराठा आरक्षणावर दिवसभर चर्चा करावीच लागेल. त्यात सर्व पक्षाचे आमदार सहभागी होऊन मराठा आरक्षण कायदा पारित करण्यासाठी एक होतील, असा विश्वास मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी व्यक्त केला.
नांदेड जिल्ह्यात पाच ठिकाणी जरांगे पाटील यांच्या सभांचे आयोजन करण्यात आले असून ते शुक्रवारी सकाळी जिजाऊनगर येथील सभास्थळी पत्रकारांशी बोलत होते. आम्ही मराठा आणि कुणबी एकच आहोत. त्याअनुषंगाने राज्यात ३० लाखाहून अधिक कुणबी नोंदी असल्याचे पुरावे आढळले आहेत. त्यामुळे शासनाने आता जास्त वेळ न घालवता मराठा आरक्षण प्रश्न मार्गी लावावा, अशी समाजाची रास्त अपेक्षा आहे. कोण काय बोलतो किंवा कुणाची काय भूमिका आहे, या पेक्षा समजभावना आणि पुरावे महत्वाचे आहेत. आम्ही कुणाच्या बोलण्याला जास्त महत्व देत नाही, पण कोणी खेटत असेल तर त्याला पण सोडत नाही, हा मराठ्यांचा इतिहास आहे.
मराठा आरक्षण आंदोलना दरम्यान ज्या आंदोलकांवर गुन्हे दाखल केले, ते मागे घेण्याचे आणि त्या कार्यकर्त्यांना अटक केली जाणार नाही, असे आश्वासन सरकारने दिले होते. परंतु ते पाळले नाही. त्याची किंमत देखील सरकारला मोजावी लागेल, असा इशारा देखील मनोज जरांगे पाटील यांनी दिला.