नांदेड - शहरातील काबरा नगर भागात किरकोळ कारणावरुन मायलेकाला मारहाण करण्यात आली होती. या प्रकरणात भाग्यनगर पोलिसांनी न्यायालयाच्या आदेशाने तिघांविरोधात गुन्हा नोंदवला आहे. ही मारहाणीची घटना ६ जानेवारी रोजी घडली होती. मात्र, पोलिसांनी तक्रार दाखल करुन न घेतल्याने महिलेने न्यायालयात धाव घेतली होती. निशा गुडमेवार या शिक्षिका मुलगा आणि पतीसह काबरा नगर भागातील यश नगरी येथे राहतात. दिनांक ६ जानेवारी रोजी सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास किरकोळ कारणावरुन शेजारी असलेल्या गंगासागर कांचनगिरे, नागेश कांचनगिरे आणि ऋतुराज कांचनगिरे या तिघांनी मारहाण केली तसेच अर्वाच्च भाषेत शिवीगाळ केली. यावेळी गुडमेवार यांच्या मुलालाही मारहाण करण्यात आली. या प्रकरणी गुडमेवार या तक्रार दाखल करण्यासाठी भाग्यनगर पोलीस ठाण्यात गेल्या होत्या. परंतु, याठिकाणी मेडिकल केल्यानंतरही त्यांची तक्रार दाखल करुन घेण्यात आली नाही. याबाबत पोलीस अधीक्षक कार्यालयातही तक्रार देण्यात आली. परंतु, तेथेही याकडे दुर्लक्ष करण्यात आल्यामुळे त्यांनी न्यायालयात धाव घेतली होती. या प्रकरणात न्यायालयाच्या आदेशाने मारहाण करणाऱ्या तिघांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.
मायलेकाला मारहाण प्रकरणात तिघांवर गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 21, 2021 4:33 AM